आखाती युद्धाचा जालना स्टील हबला मोठा फटका; कच्च्या मालाचा तुटवडा, टनमागे तीन हजारांची वाढ
By विजय मुंडे | Updated: March 10, 2026 20:10 IST2026-03-10T20:09:58+5:302026-03-10T20:10:38+5:30
यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसला असून, नवीन घर खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

आखाती युद्धाचा जालना स्टील हबला मोठा फटका; कच्च्या मालाचा तुटवडा, टनमागे तीन हजारांची वाढ
जालना : आखाती देशांमध्ये इस्रायल आणि इराण-अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता महाराष्ट्राच्या स्टील उद्योगावर गडद होऊ लागले आहे. कच्च्या मालाची आवक घटल्याने आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने, गेल्या महिन्याभरात स्टील सळईच्या दरात टनमागे तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसला असून, नवीन घर खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील स्टील उत्पादनात जालन्याचा सिंहाचा वाटा आहे. येथील कारखान्यांमध्ये वर्षाला साधारणतः ४.५ दशलक्ष टन स्टील सळईचे उत्पादन होते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि ‘आयर्न ओर’ची आवश्यकता असते. जालन्यातील उद्योजक देशातील एकूण गरजेच्या सुमारे १० टक्के कच्चा माल थेट आयात करतात. यातील मोठा हिस्सा इराण आणि ओमानसारख्या आखाती देशांतून येतो. आखाती देशांतून येणारा कच्चा माल प्रामुख्याने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या सागरीमार्गे भारतात येतो. मात्र, युद्धामुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कच्च्या मालासोबतच उद्योगाला लागणारा कोळसा आणि गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, वाढलेल्या दरांमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. परिणामी, महिनाभरापूर्वी ५८ हजार रुपये प्रति टन असलेले स्टीलचे दर आता ६१ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
इंधन दरवाढीचे संकट
भारताला होणारी कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्गावरूनच होते. या भागात तणाव वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यास रस्ते वाहतुकीचा खर्चही वाढेल, ज्याचा थेट परिणाम स्टीलच्या अंतिम किमतीवर होईल. आधीच कच्च्या मालाचा तुटवडा असताना आता वाहतूक खर्च वाढल्यास स्टील आणखी महाग होऊ शकते.
सर्वसामान्यांना फटका
आखाती देशांतून आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर सध्या मोठा परिणाम झाला आहे. गॅसचा तुटवडा आणि संभाव्य इंधन दरवाढ यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. हे युद्ध दीर्घकाळ खेचले गेले, तर भविष्यात स्टीलचे दर आणखी वधारतील. याचा थेट फटका मोठ्या पायाभूत प्रकल्पांसह सर्वसामान्यांनाही बसणार आहे.
- घनश्याम गोयल, अध्यक्ष, स्टील उद्योग समूह, जालना