शेतक-यांची जमीन गेल्यास मावेजा देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:20 IST2017-12-09T00:20:06+5:302017-12-09T00:20:13+5:30

शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असेल तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना शुक्रवारी दिले

Guardian minister assures compansation for land | शेतक-यांची जमीन गेल्यास मावेजा देऊ

शेतक-यांची जमीन गेल्यास मावेजा देऊ

परतूर : शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असेल तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना शुक्रवारी दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा यावेळी शेतक-यांनी घेतल्याने पेच मात्र कायम राहिला.
शेगाव- पंढरपूर मार्ग परतूर तालुक्यातून जात आहे. या मार्गाच्या रुंदीकरणात शेतक-यांच्या जमिनी जात असल्याचा आरोप श्रीष्टी, वाटूर, दैठणासह या मार्गावरील शेतक -यांनी करून या मार्गाचे काम गुरुवारी बंद पाडले होते. याबाबत शुक्रवारी तहसील कार्यालयात शेतक-यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लोणीकर म्हणाले, जमिनी पन्नास, शंभर वर्षापूर्वी मार्गात जमिनी गेल्या असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचा मोबदला देता येणार नाही. आज या शेगाव-पंढरपूर मार्गात जर शेतक-यांच्या मालकीची जमीन, झाडे, पाईपलाईन, पिकांचे नुकसान होत असेल तर संबंधित विभागाचे अधिकारी मोजमाप करतील. शेतक -यांना मोबदला देण्यास शासन कटिबध्द आहे. मात्र, शेतकरी जर शासनाच्या हद्दीत अतिक्रमण करून मोबदला मागत असतील तर हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच तातडीने या जमिनीचे मोजमाप करू, याची मोजणी शुल्कही शासन भरेल असेही लोणीकर यांनी सांगीतले.
जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की, शेतक-यांच्या जमिनी जर मालकीच्या असतील तर, त्या भूसंपादित करू. हा रोड रस्ता शेतातून जात असल्याची खात्री करा, मगच काम थांबवा. प्रत्येक शेतक-यांसाठी पाईप टाकून पाइपलाईन शासनाच्या खर्चाने दुरूस्त करून देऊ, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले.
शेतक-यांनी रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी मोजमाप का केले नाही. यापूर्वीही संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा दिलेला नाही. आताही आमच्या जमिनी, शेत, झाड, पीक या रोडच्या कामात जात आहे. मात्र, मावेजा देण्याविषयी काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे संपादित करावयाच्या असलेल्या जमिनीचे मोजमाप अगोदर करा, मावेजा दया व नंतरच काम सुरू करा, असा पवित्रा शेतक-यांनी बैठकीत घेतला.
बैठकीस जि. प. सदस्य राहुल लोणीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार डी. डी. फुपाटे, शेतकरी बाळासाहेब अंभुरे, प्रशांत अंभुरे, रामराव अंभुरे, शिवदास गवळी, प्रकाश अंभुरे, प्रवीण अंभुरे, शेख रहीम, धनंजय अंभुरे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.
------------

Web Title: Guardian minister assures compansation for land