भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर

By शिवाजी कदम | Published: January 31, 2024 03:05 PM2024-01-31T15:05:19+5:302024-01-31T15:05:42+5:30

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा

Future Talathi recruitment in controversy; After the results, one candidate's inquiry, 27 people on the 'radar' | भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर

भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर

- शिवाजी कदम/राहूल वरशिळ
जालना : जिल्ह्यात विविध परीक्षांमध्ये कॉपी प्रकरणे उघड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीमध्येदेखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे. २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये २८ उमेदवारांना पडलेल्या गुणांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, उर्वरित २७ उमेदवारदेखील ‘रडार’वर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षेतदेखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे. २४ जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाठ्यांच्या ११८ रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या.

परीक्षेतील गुणांवरून संशय
तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर प्रशासनाकडून निवड झालेले आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यातील मागे पुढे सीट नंबर असणाऱ्या उमेदवारांना समान गुण मिळाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या गुणांची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यातील २८ उमेदवारांना मिळालेले गुण हे संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातील १ उमेदवारांची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच यादीतील २७ उमेदवार प्रशासनाच्या ‘रडार’वर आहेत.

पुन्हा होणार कोतवाल परीक्षा
कोतवालांच्या ६९ जागांसाठी मागील वर्षी ७ ऑक्टोबरला जालना शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ५ हजार ३०६ उमेदवार पात्र होते. यातील ४ हजार ९९६ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणी समोर आले होते. यानंतर प्रशासनाकडून प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या उमेदवारांनी मागील भरतीमध्ये अर्ज दाखल केले आहेत. अशा उमेदवारांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कॉपीप्रकरणातील आरोपी असणाऱ्यांना वगळून इतर उमेदवारांना परीक्षा देता येईल.

उमेदवारांची चौकशी सुरू
तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांच्या गुणांवरून संशय व्यक्त होत आहे. यादीतील एका उमेदवाराची चौकशी करण्यात आलेली आहे. इतरही काही उमेदवारांची चौकशी करण्यात येईल. येत्या १३ फेब्रुवारी रोजी कोतवाल परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
-श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

आज गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी गट-क संवर्गातील ११८ रिक्त पदांसाठी टीसीएस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २४ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तीन दिवस पडताळणी करण्यात येत आहे. यात ३० जानेवारी रोजी निवड यादीतील अराखीव आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी विजाअ/भ.ज.क./भ.ज.ड/ विमाप्र/आदुघ/इमाव प्रवर्गातील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. तर १ फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात ११८ जागांसाठी झाली भरती
जिल्ह्यात तलाठी गट-क संवर्गातील ११८ रिक्त जागांसाठी जून २०२३ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. यात अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमाती ७, वि.जा.अ.३,भ.ज.ब.३, भ.ज.क.२, भ.ज.ड.१, वि.मा.प्र.१, इ.मा.व. ३१, ई.डब्ल्यू.एस.१२ आणि अराखीव प्रवर्गासाठी ४० जागा होत्या. त्यासाठी जिल्हाभरातून १७,८८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत तीन सत्रात टीसीएस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती.

जाहिरात निघाल्यापासून भरती वादाच्या भोवऱ्यात
तलाठी भरती जाहिरात काढल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. सुरुवातीलाच राज्य शासनाने अराखीव प्रवर्गासाठी १०००, तर मागास प्रवर्गांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादातच घेत आहे. परंतु, त्यावर कुठलाही तोडगा काढत नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.

Web Title: Future Talathi recruitment in controversy; After the results, one candidate's inquiry, 27 people on the 'radar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalanaजालना