शिरपूर पॅटर्न बंधार्‍यांच्या निविदांचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: May 31, 2014 01:06 IST2014-05-31T01:04:19+5:302014-05-31T01:06:24+5:30

जालना : कुंडलिका नदीवरील शिरपूर पॅटर्नवर आधारीत आठ बंधार्‍यांच्या कामांना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी प्रशासकीय मान्यता बहाल केली असून,

Free the route for the Shirpur Pattern Bonds | शिरपूर पॅटर्न बंधार्‍यांच्या निविदांचा मार्ग मोकळा

शिरपूर पॅटर्न बंधार्‍यांच्या निविदांचा मार्ग मोकळा

जालना : कुंडलिका नदीवरील शिरपूर पॅटर्नवर आधारीत आठ बंधार्‍यांच्या कामांना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी प्रशासकीय मान्यता बहाल केली असून, त्यामुळे या महत्वकांक्षी बंधार्‍यांच्या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी घाणेवाडी जलाशयात जलसंरक्षण मंचने सुरू केलेल्या गाळ काढणीच्या कामास आवर्जून भेट दिली होती. त्या कामांची माहिती घेतली. तसेच घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या कार्यकर्त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले होते. यावेळी या मंचने कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम सरकारने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली. पाठोपाठ सिद्धीविनायक ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. त्या ट्रस्टचे एक शिष्टमंडळ घाणेवाडीस भेट देऊन गेले. त्या ट्रस्टने शिरपूर पॅटर्नप्रमाणे बंधारे उभारणीस १० कोटींचा निधी जाहीरसुद्धा केला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झालेल्या त्या निधीतून ८ कोटी रूपये या कामांसाठी तातडीने म्हणजे २० मे २०१३ रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या खात्यात जमा केले. विशेष म्हणजे त्या अनुषंगाने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या या त्रिस्तरीय समितीने ५ जून २०१३ रोजी बैठक घेऊन कुंडलिका नदीवरील आठ बंधार्‍याच्या कामांसंदर्भात विचार विनिमय केला. तसेच जलतज्ज्ञ खानापूरकर यांना बंधार्‍याचे लोकेशन व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार बहाल केले. त्याप्रमाणे खानापूरकर यांच्यासह घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या सदस्यांनी कुंडलिका नदीचा सर्व्हे करीत बंधार्‍यांचे लोकेशन ठरविले. तांत्रिक अधिकार्‍यांनी पाठोपाठ अंदाजपत्रक तयार केले. लगेच ते विभागीय आयुक्तांमार्फत जलसंधारण मंत्रालयात सादर करण्यात आले. सरकारने त्या कामांना लगेचच हिरवा कंदील दाखविला. जिल्हाधिकार्‍यांनी पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्तरावरील नियुक्त भूजल तज्ज्ञ पी.एल. साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी वामन कदम, कार्यकारी अभियंता आर.पी. काळे, कार्यकारी अभियंता कानडे व उपजिल्हाधिकारी रवींद्र गुरव यांच्या समितीने त्या सर्व अंदाजपत्रकांची तसेच तांत्रिक गोष्टींची छाननी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी नायक यांनी या कामांना गुरूवारी प्रशासकीय मान्यता बहाल केली. कुंडलिका नदीवर उभारल्या जाणार्‍या या बंधार्‍यांमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी अडविले जाणार आहे. या बंधार्‍यांचा काही गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी उपयोग होणार असून, हे बंधारे गावागावातील विहिरींसह हातपंपांची पाणीपातळी वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहेत. प्रत्येक बंधार्‍याच्या किमान ५ कि़मी. अंतरापर्यंत पाणीपातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज भूजलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे बंधारे जालना तालुक्यातील अनेक खेड्यांकरिता महत्त्वाकांक्षी ठरणार असून, त्यामुळे या बंधार्‍यांच्या उभारणीकडे आता संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागणार आहे. दरम्यान, जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी या बंधार्‍यांच्या उभारणीसंदर्भात लवकरच कार्यवाही सुरू होईल, असा विश्वास दिला असल्याची माहिती मंचाने दिली. (प्रतिनिधी)कुंडलिका नदीवर घाणेवाडीपासून ते जालन्यापर्यंत प्रत्येकी १ कि़मी. अंतरावर शिरपूर पॅटर्नवर आधारित हे बंधारे उभारले जाणार आहेत. त्यातील के-२ क्रमांकाचा निधोना व के-१० क्रमांकाचा रामतीर्थ बंधारा तयार आहे. अन्य सहा बंधार्‍यांची कामे आता सुरू होणार आहेत. या बंधार्‍यांच्या कामांच्या निविदांचा मार्ग मोकळा झाला असून, आता त्या बंधार्‍यांची कामे दर्जेदार व्हावीत म्हणून, सर्वार्थाने प्रयत्न केले जातील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. घाणेवाडी जलसंरक्षण मंचनेही या बंधार्‍यांची कामेही योग्य पद्धतीने व्हावीत. निधीचा पुरेपूर उपयोग व्हावा व ही कामे दूरगामी परिणामकारक ठरावीत, म्हणून सर्वार्थाने नियंत्रण ठेवले जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: Free the route for the Shirpur Pattern Bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.