जालना जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:27 IST2020-11-20T19:26:34+5:302020-11-20T19:27:37+5:30
जिल्ह्यातील १०९०७ शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी कोटेशन भरले आहेत.

जालना जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा
जालना : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत कृषीपंपाची जोडणी मिळावी, यासाठी पैसे भरून एक ते दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही पैसे भरलेल्या ४ हजार १९६ शेतकऱ्यांना कृषीपंप मिळाला नाही.
जिल्ह्यातील १०९०७ शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी कोटेशन भरले आहेत. त्यापैकी १० हजार ७५८ शेतकऱ्यांची वीज जोडणीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ५६२ कृषीपंप देण्यात आला. उर्वरित ४ हजार १९६ शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप देण्यात आले नाहीत.
निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?
१० निवडलेल्या कंपन्यांना १० हजार ६५८ कृषीपंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार लाभार्थ्यांचा कृषीपंप बसविण्यात आला आहे. खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागावा, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना १६ हजार ५६० रूपयांचे कोटेशन भरावे लागते. दरम्यान, बहुतांश शेतकऱ्यांचे सौर कृषीपंप बसविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महावितरण कंपनीने तातडीने पंप बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.