चार कारखान्यांचा बॉयलर पेटला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:23 AM2019-11-28T00:23:37+5:302019-11-28T00:23:56+5:30

जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे

Four factory boilers burnt ... | चार कारखान्यांचा बॉयलर पेटला...

चार कारखान्यांचा बॉयलर पेटला...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील तीन सहकारी आणि दोन खाजगी कारखान्यांपैकी रामेश्वर सहकारी कारखाना वगळता अन्य चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. समर्थ आणि सागर या कारखान्यांचा गळीत हंगामास गुरूवारपासून प्रारंभ होत असल्याचे विभागीय साखर सहसंचालकांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात सर्वात जुना सहकारी कारखाना म्हणून सहकार महर्षी स्व. अंकुशराव टोपे यांनी अंकुशनगर येथे सुरू केला होता. नंतर त्यांनी तीर्थपुरी येथे सागर कारखाना सुरू केला होता. या दोन्ही कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र हे, १६ हजार ५०० हेक्टर एवढे असून, जवळपास ३ हजार हेक्टरवरील ऊस अन्य जिल्ह्यांतून आणावा लागणार आहे. यावेळी समर्थ आणि सागर कारखान्याचे यंदाचे साखर गाळपाचे उद्दिष्ट हे पाच लाख मेट्रिक टन ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ९०० बैलगाड्या, २५० उसतोड कामगारांच्या टोळ्या कार्यरत असून, ३०० पेक्षा अधिक छोटे ट्रॅक्टर उसाची वाहतूक करण्यासाठी लावले असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या दोन्ही कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वीच जालना जिल्ह्यातील परतूर येथील बागेश्वरी सहकारी साखर कारखाना आणि कुंभारपिंपळगाव येथील समृध्दी हे दोन खासगी तत्वावरील साखर कारखान्यांनी यापूर्वीच त्यांचा गळीत हंगाम प्रारंभ केला आहे. केवळ भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी अत्यंत प्रतिकूल स्थितीत १७ गळीत हंगाम पूर्ण केले. गेल्यावर्षी दुष्काळामुळे या भागातील उसाची लागवड अत्यल्प होती, तसेच जो ऊस शिल्लक आहे, तो वाळून गेला असून, काही ऊसाचा उपयोग हा गुरांच्या चाऱ्यासाठी केल्याने उसच शिल्लक नसल्याने यंदा आम्ही गळीत हंगाम सुरू करणार नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने साखर आयुक्तांना कळविले आहे.
दरम्यान रामेश्वर सहकारी साखर कारखाना यंदा चालू होणार नसला तरी या हंगामात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी या परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढून ऊस उपलब्ध होईल, अशी आशा कारखाना व्यवस्थापनाला आहे.
सौर उर्जेला प्राधान्य : साखर उद्योगासोबतच पूरक उद्योग
आज केवळ साखरेचे उत्पादन घेणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे या कारखान्यांनी उसापासून निघणारी मळी तसेच आता इथेनॉलचे प्रकल्प सुरू केले आहेत. या सोबतच सौर उर्जेला प्राधान्य देत यातील काही कारखान्यांनी को-जनरेशन प्लांटही उभारले आहेत. यामुळे कारखान्याला लागणारी विजेची गरज पूर्ण होऊन हे कारखाने वीज वितरण कंपनीला आपली उत्पादित वीज विक्री करून त्यातूनही अर्थाजन करतात.
त्यामुळे ग्रामीण भागासाठी हा उद्योग महत्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी साखर कारखाने हा महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही कारखाना क्षेत्रा व्यतिरिक्त केवळ ऊसतोड कामगारांना या हंगामातच मोठी मागणी असते.
उसावरील बंदीचा प्रस्ताव मागे घेण्याची गरज
ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धतता आवश्यक असते. त्यामुळे उसाला पूर्णपणे ठिबक पद्धतीने पाणी देण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. त्यातच मध्यंतरी विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यात उसाचे पीक घेण्यास मज्जाव करावा काय, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु हा प्रस्ताव सहकारी साखर कारखान्यांसाठी घातक असून, हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: Four factory boilers burnt ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.