शासकीय, खासगी रुग्णालयांमध्येच सूचनांकडे पाठ; कशी रोखणार लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:50+5:302021-09-02T05:04:50+5:30

जालना : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. परंतु, शहरातील शासकीय रुग्णालयासह ...

Follow instructions only in government and private hospitals; How to stop the wave? | शासकीय, खासगी रुग्णालयांमध्येच सूचनांकडे पाठ; कशी रोखणार लाट?

शासकीय, खासगी रुग्णालयांमध्येच सूचनांकडे पाठ; कशी रोखणार लाट?

जालना : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. परंतु, शहरातील शासकीय रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयांमध्येच प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

शहरातील शासकीय रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयांमधील बाह्यरूग्ण विभागाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी मोजकेच नागरिक मास्क लावून होते. अनेकजण विनामास्क, सुरक्षित अंतराला तिलांजली देऊन बसले होते. दरम्यान, याबाबत संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नवीन जालना भागातील ढवळेश्वर परिसरात असलेल्या शतायु हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी मोजक्याच नागरिकांनी मास्क घातल्याचे दिसून आले. अनेकजण सुरक्षित अंतराला तिलांजली देत विनामास्क बसले होते.

औषध विक्रेत्यांचे दुर्लक्ष

औषध विक्रेत्यांंचा रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांशी सतत संपर्क येतो. संबंधितांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परंतु, ढवळेश्वर गेट परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करणारे विनामास्कच ग्राहकांशी व्यवहार करीत होते.

डेंग्यू, चिकुनगुण्याचे रुग्ण वाढले

बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यात डेंग्यूसदृश आणि चिकुनगुण्याचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात येणारे रुग्ण अधिकतम या आजाराने पीडित असल्याचेही दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.

ओपीडी हाऊसफुल्ल

शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांची ओपीडी सध्या फुल्ल होत आहे.

विशेषत: सर्दी, खोकला, तापीसह इतर साथ रोगांच्या रुग्णांची भर पडली आहे.

वरील आजाराची लक्षणे पाहता संबंधित रुग्णालय प्रशासनाने सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये...

शासकीय, खासगी रुग्णालयात रुग्णांसोबत नातेवाइकांची गर्दी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि सूचनांचे होणारे उल्लंघन पाहता रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दक्षतेबाबत सूचना

शासकीय रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोरोनाची संभाव्य लाट पाहता सर्वांनी मास्क वापरासह प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

- डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक

Web Title: Follow instructions only in government and private hospitals; How to stop the wave?