जालना : अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ कर लादला आहे. चीन, अमेरिकेतून येणाऱ्या मालांमुळे स्वदेशी उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी विदेशी मालाची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन कॅटचे मराठवाडा अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले. यावेळी विविध ठरावही पारित करण्यात आले.
शहरातील हॉटेल मधुबनच्या सभागृहात सोमवारी व्यापारी महासंघाची बैठक बंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश पंच, मराठवाडा विभागीय सचिव सुखदेव बजाज, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश राऊत, महिला आघाडीची अध्यक्ष सीता मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधानांनी राष्ट्रहितासाठी स्वदेशी मालालाच प्राधन्य द्या असे व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशात कॅट व्यापारी संघटनेतर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे.
संपूर्ण मराठवाड्यात संपर्क दौरा, बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्यात स्वदेशीवर भर देऊन विदेशी मालावर बंदी आणण्यासाठी जन-जागरण करू, प्रत्येक प्रतिष्ठानावर फलक व शहरात गावात होर्डिंग बोर्ड लावून प्रचार-प्रसार करू, असे बंब यावेळी म्हणाले. यावेळी सतीश पंच, मोहिते, राऊत, बजाज, आनंदी अय्यर, प्रिया जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अतुल लढ्ढा यांनी घर-घर तिरंगा, हर दुकान तिरंगा अभियान प्रारंभ करण्याबाबत सूचित केले. बैठकीसाठी संदीप काबरा, शिवजी तनपुरे, रामभाऊ मोहिते, प्रमोद जोशी, ॲड. सुब्रह्मणयम अय्यर, अनिकेत अय्यर, श्री गाजरे, आदींनी परिश्रम घेतले.