रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती घेणारे पाच पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:30 IST2021-06-15T14:29:39+5:302021-06-15T14:30:06+5:30
5 Police suspended who raids on Raosaheb Danve's office या निलंबनामुळे जालना पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत.

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती घेणारे पाच पोलीस कर्मचारी निलंबित
जालना : कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. या प्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
११ जून रोजी जाफराबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे जाऊन जाफराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, युवराज सुभाष पाेठरे हे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके आणि महिला पोलीस कर्मचारी शबाना जलाल तडवी यांनी कायदेशीर आदेश नसताना झाडाझडती घेतली. याप्रकरणी दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशी अंती पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी निलंबित केले. या निर्णयाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
जालना पोलीस पुन्हा चर्चेत
या निलंबनामुळे जालना पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या महिन्यात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व अन्य दोन पोलीस निलंबित झाले होते. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण प्रकरणही गाजले होते. ही प्रकरणे शांत होत नाहीत, तोच पुन्हा एकदा जालना पोलीस चर्चेत आले आहेत.