भरदिवसा भुसार व्यापाऱ्याच्या हातातून पाच लाख रुपये हिसकावले
By दिपक ढोले | Updated: May 13, 2023 21:30 IST2023-05-13T21:30:37+5:302023-05-13T21:30:58+5:30
सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भरदिवसा भुसार व्यापाऱ्याच्या हातातून पाच लाख रुपये हिसकावले
जालना : भरदिवसा भुसार व्यापाऱ्याच्या हातातून अज्ञात चोरट्याने पाच लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना भोकरदन शहरात शनिवारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली असून, सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
भोकरदन शहरात शनिवारी आठवडी बाजार असल्याने गर्दी होती. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुसार व्यापारी इरफान नाशिबखान पठाण यांचे दुकान आहे. ते शेतकऱ्यांकडून मका, सोयाबीन खरेदी करीत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक इसम त्यांच्या आडत दुकानावर आला. त्याने काही कळण्याच्या आत इरफान पठाण यांच्या हातातून पाच लाख रुपयांचे बंडल हिसकावून नेले. तेथून तो फरार झाला.
व्यापारी व नागरिक पकडण्यासाठी गेले असता, त्याने चकवा देऊन पळ काढला. मात्र तो एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि. रत्नदीप जोगदंड, बालाजी वैद्य, पोलिस उपनिरीक्षक कुटुंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.