महानगरपालिका झाल्यानंतर जालन्यात पहिलीच निवडणूक; काँग्रेसची कसोटी, महायुतीत असमन्वय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:14 IST2025-12-16T12:10:10+5:302025-12-16T12:14:06+5:30
महानगरपालिकेची पहिली निवडणूक; सर्वपक्षीय इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

महानगरपालिका झाल्यानंतर जालन्यात पहिलीच निवडणूक; काँग्रेसची कसोटी, महायुतीत असमन्वय!
जालना : नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दोन वर्षे लोटली असून, प्रथमच होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय इच्छुकांसह नेत्यांनी जोर लावला आहे. नगरपालिकेत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. महायुतीबद्दल मित्रपक्षांमध्येही एकवाक्यता नसून, भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा जनतेतून विजयी झाल्या होत्या, तर ६१ पैकी २९ सदस्य काँग्रेसचे विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या ९ नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने सत्ता मिळविली होती, तर शिवसेना-भाजपला प्रत्येकी ११ जागा मिळाल्या होत्या, तर दोन अपक्षांनीही बाजी मारली होती. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी २०२१ मध्ये संपला तरी निवडणुका मात्र विविध कारणांनी लांबणीवर पडल्या होत्या. गत निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाटा मोठा होता; परंतु गाेरंट्याल हेच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात पक्षीय फुटाफुटीचाही परिणाम स्थानिक राजकारणावर दिसून येत आहे.
महायुतीतील मित्रपक्ष भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये महायुतीबाबत बैठका झाल्या असल्या तरी ठोस निर्णय झालेला नाही. त्यात भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे असून, शिंदेसेना, अजित पवार गट एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे दिसते. दुसरीकडे महायुतीतील काँग्रेस पक्षाची शहरातील राजकीय ताकद तुलनेने इतर पक्षांपेक्षा अधिक आहे. त्यात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला असून, जिल्हाप्रमुखपद अद्यापही रिक्तच आहे. त्यामुळे मविआची मोट बांधणे आणि निवडणुकांत विजय मिळविण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचीच कसोटी लागणार आहे.
चार नगरसेवक वाढणार
जालना नगरपालिकेत ६१ नगरसेवक आणि जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षा अशा ६२ सदस्यांची नियुक्ती झाली होती. यंदाच्या निवडणुकीसाठी १६ प्रभाग असून, ६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या चारने वाढली आहे.
इतर पक्षांची भूमिका महत्त्वाची
महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एमआयएम, समाजवादी पार्टी आदी पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मागील निवडणुकीत एमआयएम, वंचितच्या उमेदवारांनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली होती. यंदाही हे पक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.