तलवारीने केक कापण्याची फॅशन वाढली; पोलीस कारवाईत लाईक करणारेही येणार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 17:08 IST2021-08-26T17:03:57+5:302021-08-26T17:08:04+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मागील दोन वर्षांपासून तलवारीने केक कापणाऱ्यांची संख्या घटली

तलवारीने केक कापण्याची फॅशन वाढली; पोलीस कारवाईत लाईक करणारेही येणार अडचणीत
जालना : हल्ली तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तलवारीने केक कापून व्हिडिओ टाकणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मागील तीन वर्षांत तब्बल १६ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मागील दोन वर्षांपासून तलवारीने केक कापणाऱ्यांची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
तलवारीने केक कापण्याची फॅशन
एखाद्या तरुणाचा वाढदिवस असल्यास तो सध्या पध्दतीने केक न कापता तलावारीने केक कापत असतो. त्यानंतर त्याचा व्हिडोओ सोशल मीडियावर टाकला जातो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पोलिसांपर्यंत जातो. त्यानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करतात. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तलवार अन् चाकू
कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शासनाने तलवार, चाकूने केक कापण्यास मनाई केली आहे. तरीही बहुतांश तरुण तलवारीने केक कापतात. जालना जिल्ह्यातही लपूनछपून काही तरुण तलवारीने केक कापतात. पोलीस त्यांच्यावर कडक नजर ठेवून आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील गांधी चमन परिसरात एका तरुणाने तलवारीने केक कापून रस्त्यावर धिंगाणा घातला होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती.
लाईक करणारेही येणार अडचणीत
तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जातो. त्याला अनेकजण लाईक करतात. परंतु, जे लोक अशा व्हिडिओंना लाईक करतात, त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. यासाठी नागरिकांनी अशा व्हिडिओंना लाईक करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. शिवाय, कोणीही तलवारीने केक कापून नये, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.