भारनियमनामुळे शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:25+5:302020-12-29T04:29:25+5:30
यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. ...

भारनियमनामुळे शेतकरी हैराण
यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. जोरदार पावसामुळे जवळपास सर्वच धरणे, तलाव व विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रबी हंगामाच्या पिकांची लागवड केली आहे. सध्या पिके चांगलीच बहरलेली आहे. बहुतांश शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना जागी राहून पाणी द्यावे लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. बिबट्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर तसेच वन्यप्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यावर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
अगोदरच खरिपातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने रबीच्या पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, महावितरणच्या भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येत असल्याने पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
रामेश्वर राऊत, शेतकरी, सौंदलगाव
वीजपुरवठ्याचे नियोजन हे राज्यस्तरावरील आहे. संबंधित यंत्रणेच्या सूचनांचे पालन करूनच हे नियोजन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजपुरवठा केला जातो.
एस.एस. हरकल, सहायक अभियंता