Farmers' cheat by the government - Kailas Gorantyal | सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक -कैलास गोरंट्याल
सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक -कैलास गोरंट्याल

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची केवळ दिशाभूल केली आहे. अच्छे दिन च्या नावाखाली आज मंदीचे सावट सर्वत्र दाट झाले आहे. यामुळे सामान्य माणूस हैराण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
त्यांनी जालना विधासभेतील विविध गावांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, बाजीउम्रद तांडा, मोतीगव्हाणसह अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. अनेकांनी पीकविमा, कर्जमाफी ही फसवी कशी आहे, याची अनेक उदाहरणे दिली. तसेच पीकविम्याच्या नावाखाली सरकारने विमा कंपन्यांचीच तिजोरी भरली आहे. यात शिवसेना सत्तेत राहून मोर्चा काढण्याची वेळ थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवरच आली आहे, यावरूनच विमा कंपन्यांनी सरकारलाच कसे फसवले हे लक्षात येते.
आजही अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. बँकाकडून अडवणूक सुरू आहे. मध्यवर्ती बँकेचे आपण उपाध्यक्ष असल्याने तेथे जातीने लक्ष घालून कर्ज वाटपाचा टक्का यंदा वाढवल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला.
एकूणच या राज्यात केवळ राजकीय नौटंकी सुरू आहे. अनेकांना पक्षात घेऊन निवडणुका जिंंकता येतात हा समज जनता यापुढे सहन करणार नसल्याचा विश्वास आपल्याला असल्याचे प्रतिपादनही गोरंट्याल यांनी केले.
यावेळी त्यांनी विविध शेतक-यांच्या घरी जाऊन समस्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश चौधरी, गणेश खरात, संजय शेजूळ, सोपान तिरुखे, अंजेभाऊ चव्हाण, युवराज चव्हाण, दत्ता पा. शिंदे, नारायण वाढेकर, राजेंद्र शिंदे, मल्हारी पठाडे, समाधान शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Farmers' cheat by the government - Kailas Gorantyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.