Fake currency notes in Shahgad area | शहागड परिसरात बनावट नोटा चलनात
शहागड परिसरात बनावट नोटा चलनात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अचानक झालेल्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर कालांतराने चलनात आलेल्या नवीन शंभर, दोनशे रुपयांच्या नोटानंतर त्यांच्या बनावट नोटा चलनात फिरत आहेत. नवीन नोटांच्या कागदाच्या तुलनेत बनावट नोटांचा कागद नाजूक व रंग फिका आहे. घाईगडबडीत नोटांकडे लक्ष न दिल्याने या नोटांचे लोण जिकडे-तिकडे पसरत आहे.
खूपच बारकाईने लक्ष दिल्यास नोटांमधील बदल दिसून येतो. मात्र बनावट नोटांचा गैरधंदा करणारे गर्दीच्या ठिकाणी, भरपूर नोटांच्या बंडलमध्ये चार-दोन बनावट नोटा टाकून आपले उखळ पांढरे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहागडसह परिसरात व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना व नागरिकांना नवीन नोटांच्या कागदाच्या तुलनेत नाजूक, फिकट रंगाच्या बनावट शंभर, दोनशेच्या नोटा देण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीकडे शहागड बसस्थानकसमोर घाईगडबडीत शंभर रुपयांची बनावट नोट आली होती. त्याने ब-याच ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेक जणांनी ती बनावट असल्याचे सांगून घेण्याची टाळली. तोच डोमलगाव येथील शेतकरी निवारे यांनी एका व्यापा-याकडून घेतलेल्या नोटांच्या बंडलमध्ये एक दोनशेची नोट बनावट निघाली.
निवारे यांनी बºयाच ठिकाणी बनावट नोट चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळ्यांनी ती नाकारली.
त्यामुळे निवारे यांना दोनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंडही बसला आहे. त्यामुळे त्यांनी नवीन नोटांच्या बनावट नोटा चलनात आल्याबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना दोनशे रुपयांचा फटका बसला असल्याने संताप व्यक्त केला.
याबाबत येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जतीन सुखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बनावट नोटाविरुध्द तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. तसेच ते म्हणाले की, अद्यापही कोणीही तक्रार केलेली नाही.
पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांना पोलीस चौकीत तक्रार आली आहे का, असे विचाले असता, त्यांनी सांगितले की, कुठल्याही प्रकाराची तक्रार आमच्याकडे आली नाही. ही तक्रार बँकेकडे करावी लागते.


Web Title: Fake currency notes in Shahgad area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.