भरपावसाळ्यातही जाफराबादकर तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:42+5:302021-09-03T04:30:42+5:30
जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही ...

भरपावसाळ्यातही जाफराबादकर तहानलेलेच
जाफराबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या बाधित क्षेत्रातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. असे असतानाही नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
शहरातील आदर्शनगर, सिद्धार्थनगर, राजे संभाजीनगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, बाळाजीनगर या भागात गेल्या एक महिन्यापासून नळाला पाणी आले नाही. यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कधी नळाला पाणी आलेच तर कमी दाबाने येते. त्यामुळे पूर्ण पाणी भरता येत नाही. अनियमित वेळी पाणी सोडण्यात येत असल्याने महिन्याभरापासून नागरिक हैराण झाले आहे. सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहे. कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जाफराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना भरपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शहराला पाणीपुरवठा करणारी निमखेडा बुद्रुक येथील विहीर तुडुंब भरलेली आहे. असे असतानाही गेल्या महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत आहे. नगरपंचायत सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे तर कधी विद्युतपंप जळाल्याचे कारण पुढे करीत आहेत. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.
सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस
नगरपंचायतीमध्ये नियोजनशून्य कारभार सुरू आहे. कोरोनाच्या नावाखाली अधिकारी जबाबदारी टाळत आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी मिळाले त्यांनाही अशुद्ध पाणी मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सिंधू कैलास दिवटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस
सध्या नागरिकांना महिन्यातून एकवेळसुद्धा सुरळीत पाणी मिळत नाही. बहुतांश महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा परिणाम घरातील कामांवर होत आहे. भरपावसाळ्यात मिळेल तेवढे पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे.
प्रभाकर कुदर, नागरिक
पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वय नाही म्हणून दरवर्षी पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. पाण्याच्या अनियमित वेळा व कमी दाबाने येणारे पाणी यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
कौसर शेख, माजी नगरसेवक