साथ नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:13 IST2019-06-26T00:12:43+5:302019-06-26T00:13:07+5:30
पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत.

साथ नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज...
विकास व्होरकटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि या काळात अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे.
पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा वाटणे, डेंगू, मलेरिया यासारख्या अनेक साथरोगांचा फैलाव होतो. त्यामुळे जालना जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाभरात विविध ४९ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्हास्तरीय एक पथक, तालुकास्तरीय आठ पथके व जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथके २४ तास कार्यरत असून, आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.
दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ््यामध्ये काही प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे यंदा १ जून पूर्वीच आरोग्य यंत्रणा सर्तक झाली होती. पावसाळ््यामध्ये दूषित पाणी पिण्यात येते. यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार नागरिकांना होतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांना तातडीने सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणा सूचना करण्यात आल्याचे नागदरवाड यांनी सांगितले.