'दिलेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्या'; जालन्यात आढळला चालुक्यकालीन शिलालेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:03 IST2025-01-23T18:00:23+5:302025-01-23T18:03:26+5:30

अकराव्या शतकातील देवनागरी लिपीतील मराठी शिलालेखाने अनेक नव्या बाबी प्रकाशझोतात

'Enjoy the gift given honestly'; Chalukya era Marathi inscription found in Jalna | 'दिलेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्या'; जालन्यात आढळला चालुक्यकालीन शिलालेख

'दिलेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्या'; जालन्यात आढळला चालुक्यकालीन शिलालेख

- अशोक डोरले
अंबड :
जालना जिल्ह्याच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा अकराव्या शतकातील एक चालुक्यकालीन शिलालेख अंबड तालुक्यातील किनगाव येथे सापडला असून प्रस्तुत शिलालेख देवनागरी लिपीत असून संपूर्णतः मराठी भाषेत आहे. अकराव्या शतकातील मराठी भाषेचा नमुना म्हणून महत्वाचा ठरतोय.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठीतील अतिशय प्राचीन शिलालेखांपैकी एक ठरणाऱ्या या गद्यगळ शिलालेखाचे प्रकाशात येणे औचित्यपूर्ण आहे. अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी संशोधन केलेल्या गद्यगळ रुपी शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी केले आहे. 

शिलालेखात ‘सालुक’ म्हणजेच चालुक्य वंशातील राणक ‘अय्यण’ याने केलेल्या एका दानाची नोंद केलेली आहे.अकराव्या शतकात कल्याण येथील चालुक्य घराण्याचे दक्षिण भारतावर राज्य होते. त्या घराण्यातील ‘विक्रमादित्य पाचवा’ याचा ‘अय्यण दुसरा’ या नावाने ओळखला जाणारा एक भाऊ असून तो विक्रमादित्यानंतर अल्पकाळ राज्यावर आला होता. प्रस्तुत शिलालेखातील अय्यण हा एकतर अय्यण दुसरा किंवा त्याचा कुणीतरी थेट वंशज असावा असा पिंगळे यांचा तर्क आहे. अय्यण दुसरा याने सत्तासंघर्षामुळे गोदावरीच्या उत्तरेकडे स्थलांतर करून स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात त्या प्रदेशावर शासन केले असावे कारण त्या प्रदेशात चालुक्यांच्या मुख्य शाखेच्या अस्तित्वाचे फारसे पुरावे मिळत नाहीत. तसेच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धातील यादव राजा ‘भिल्लमदेव पाचवा’ याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन करतेवेळी मराठवाड्यातील काही लहान शासकांना पराभूत केल्याच्या उत्तरकालीन साधनांतील उल्लेखांवरूनही या शक्यतेला दुजोरा मिळतो. या विषयावर विस्तृत शोधलेख लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.

हा गद्यगळ अर्थात दान केल्याचा शिलालेख असून ज्यास दान केले आहे त्याने मिळालेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्यावा, असे वचन असते. वचन मोडल्यास त्याच्या घराण्यास शिव्याशाप लागेल, अशी धारणा प्रचलित होती. प्रस्तुत गद्यगळावर सूर्य, चंद्र, गर्दभ आणि कोरीव लेख आहेत. गद्यगळ संशोधनासाठी लक्ष्मण बोबंले व मुकेश गाडेकर यांनी ही परिश्रम घेतले.

Web Title: 'Enjoy the gift given honestly'; Chalukya era Marathi inscription found in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.