एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ
By शिवाजी कदम | Updated: July 28, 2023 18:39 IST2023-07-28T18:38:51+5:302023-07-28T18:39:03+5:30
शहागड तालुक्यातील वाळकेश्वर, कुरण शिवारातील घटना

एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ
शहागड : आठवडी बाजारात मोबाईल चोर, बसस्थानक परिसरात मनी मंगळसूत्र, पाॅकेट चोर, महामार्गावर दुचाकी चोर हे प्रकार व गुन्हे सर्वपरिचित आहेत. आता चोरांनी शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. शहागड, वाळकेश्वर, कुरण परिसरातून शुक्रवारी सकाळी आठ मोटारी चोरीला गेल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीतून एक नाही तर तब्बल आठ विद्युत मोटारींवर हात साफ केला आहे. अज्ञात चोरांनी वाळकेश्वर व कुरण शिवारातील हमीद फुलारी, कदीर बागवान, इलियास बागवान, अलीम तमीजोद्दीन, शाहेद बागवान, ताजोद्दीन बागवान या शेतकऱ्यांच्या गोदावरी नदी काठावर असलेल्या तब्बल आठ विद्युत मोटारी चोरी गेल्या आहेत. नवीन विद्युत मोटारसाठी पंचवीस हजार रुपये लागतात. तर जूनी मोटार भरून घ्यावयाची असल्यास आठ हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी इलियास बागवान, शाहेद बागवान यांनी सांगितले.
वजनदार मोटारी नेल्या कशा
विद्युत मोटारीचा कना म्हणजे त्यात असलेली तांब्याची तार. बाजारात तांब्याच्या तारीचे बाजारमूल्य एक हजार रुपये किलो आहे. एक मोठ्या विद्युत मोटारीत पाच किलो तांब्याच्या तारांचा वापर होतो. त्यामुळे चोरट्यांना वजनदार मोटारी उचलून घेऊन जाणे जिकीरीचे काम असल्याने ते जागेवर मोटार खोलून त्यातील तांब्याची तारी काढून घेऊन जातात. वाळकेश्वर, कुरण शिवारात चोर आठ विद्युत मोटारी थेट उचलून घेऊन गेले आहेत. एका मोटारीचे वजन जवळपास पंधरा ते वीस किलो असते. एवढी जड विद्युत मोटारी लांबवल्याने या भागातील शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत.