८० गुंठ्यांवरील वांगी शेतातच सडली; कडक निर्बंधांमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:56 IST2021-05-19T17:55:38+5:302021-05-19T17:56:29+5:30
पीकही जोमात आले होते. यातून त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती; परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले आहेत.

८० गुंठ्यांवरील वांगी शेतातच सडली; कडक निर्बंधांमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान
- राजू छल्लारे
वडीगोद्री (जि. जालना) : कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारपेठ बंद असल्याने अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील एका शेतकऱ्याची ८० गुंठ्यांवरील वांगी तोडणीअभावी खराब झाली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील नालेवाडी येथील मनोहर बांगर यांनी त्यांच्या शेतात १७ जानेवारी २०२१ रोजी ८० गुंठ्यांत वांग्याची लागवड केली होती. वांग्याच्या लागवडीवर त्यांना जवळपास २० हजार रुपयांचा खर्च आला. शिवाय, वांग्याला २५ हजार रुपयांचे ठिंबक सिंचन केले. पीकही जोमात आले होते. यातून त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती; परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. या काळात बाजारपेठ बंद झाली. शासनाने सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा दिली; परंतु या काळात काही प्रमाणातच वांग्यांची विक्री झाली. ७ हजार रुपयांची वांगी त्यांनी विकली. उर्वरित वांगी शेतातच सडली आहे. यात बांगर यांचे जवळपास ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होते; परंतु कोरोनामुळे होत असलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
सरकारने आर्थिक मदत करावी
शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार बंद आहेत. वांग्यांची विक्री कशी करावी, अशा प्रश्न माझ्या समोर आहे. यंदा केवळ ७ हजार रुपयांची वांगी विकली आहेत, तर ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत घ्यावी.
- मनोहर बांगर, शेतकरी, नालेवाडी