Efforts to focus more on cyber crime | सायबर गुन्ह्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी प्रयत्न
सायबर गुन्ह्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली.
जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची तपासणी, कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी ते जालना येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरूवारी दिवसभरात वाहतूक शाखेच्या कारभाराचा आढावा घेतला. वाहतूक शाखेकडून केल्या जाणाऱ्या कारवाई, वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडी, तक्रारी यासह इतर बाबींची त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शिवाय पोलीस मुख्यालयांतर्गत कामकाजाचाही आढावा त्यांनी घेतला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सिंघल म्हणाले, शहर वाहतूक शाखेच्या कामाचा आढावा घेतला आहे. मोकाट जनावरे कारवाईसाठी पालिकेने वाहन दिले असून, कारवाई करण्यात येईल. निधी प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येतील. गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलीस दल वेळोवेळी आवश्यक ती दक्षता घेते.
मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषत: आर्थिक फसवणूक, सामाजिक द्वेष पसरविणारे गुन्हे घडत आहेत. यात अधिकाधिक शिक्षित आरोपींचा समावेश दिसून येतो. गुन्ह्याचे बदलणारे स्वरूप पाहता पोलीस दलही असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचाºयांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, असेही सिंघल यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, सिंघल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी परेड होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील ठाणेनिहाय दाखल गुन्हे, गुन्ह्यांचा उलगडा यासह इतर बाबींवर आढावा घेतला जाणार आहे.
शहरातील कदीम पोलीस ठाणे, सदरबाजार पोलीस ठाण्याची इमारत जुनी आहे. तालुका पोलीस ठाणे तात्पुरत्या इमारतीत सुरू आहे. शहरातील पोलीस चौक्यांची अवस्थाही बिकट आहे.
जिल्ह्यातील इतर काही पोलीस ठाण्यांच्या इमारती, अधिकारी, कर्मचा-यांची निवासस्थाने हे प्रश्नही आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठस्तरावरून विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

Web Title: Efforts to focus more on cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.