खाद्यतेलाने महागाईमध्ये तेल ओतले, वर्षभरात लिटरमागे ८७ रूपयांपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:13+5:302021-04-02T04:31:13+5:30
जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ...

खाद्यतेलाने महागाईमध्ये तेल ओतले, वर्षभरात लिटरमागे ८७ रूपयांपर्यंत वाढ
जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ४७ रूपयापर्यंत भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. खाद्यतेलाची दरवाढ दुुप्पटीकडे जात असतानाही विक्रीत परिणाम झाला नाही.
मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे १५ ते २० रूपयांनी उतरले. मात्र, त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली.
दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांना होती. परंतु, ती फोल ठरली. अनपेक्षितपणे तेल दराचा भडका सुरू राहिला. खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला आहे. तेलाच्या वाढत्या दरामुळे व्यापारी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहे.
सूर्यफूल तेलात ८५ रूपयांनी वाढ
गतवर्षीच्या तुलनेत सूर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले. पाम तेलामध्ये ४५, तर सरकी तेलात ५० रूपयांची वाढ झाली. एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण आहे. तर दुसरीकडे तेलाच्या दरात वाढत होत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
वर्षभरापासून तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली आहे. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४१ ते ८७ रूपयापर्यंत वाढले आहे. भाव वाढले असले तरी त्याचा विक्रीवर परिणाम झाला नाही.
किसन राठोड, किराणा व्यापारी
मागील काही दिवसापासून खाद्यतेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाव वाढले असले तरी दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. त्यामुळे तेल खरेदी करावेच लागते. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.
निकिता शेवाळे, जालना
कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल. मात्र, इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणूस महिन्याला अर्धा किलो तेल आवश्यक असले तरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल ?
मुक्ता माने, जालना
मागील काही दिवसापासून तेलाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकात तेल अत्यावश्यक असल्याने तेल खरेदी करावेच लागते. किराणा खरेदी करताना इतर वस्तू कमी करून तेल खरेदी करावे लागत आहे. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.
मंदा गायकवाड, जालना