वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 07:55 PM2019-12-24T19:55:57+5:302019-12-24T19:57:13+5:30

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत

During the year 108 farmer ended his life; Most farmers commit suicide this year from 19 years | वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

Next

- विजय मुंडे 

जालना : दुष्काळ, नापिकी, रोगराईमुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. कुटुंबासमोरील प्रश्न, आर्थिक चणचण यासह इतर विविध कारणांनी चालू वर्षात आजवर तब्बल १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मदतीसाठी दाखल प्रकरणांपैकी ९० मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी सतत या ना त्या कारणांनी आस्मानी-सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकत आहे. हाती न येणारे शेतातील उत्पन्न आणि कुटुंबासमोर असलेले अनेक प्रश्न यातून हताश होणारे शेतकरी गळफास लावून, विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करीत आहेत. २००१ ते २०१९ या कालावधीत आजवर जिल्ह्यातील तब्बल ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ४९२ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. तर १०० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चालू वर्षातील १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. 

गत १९ वर्षांची आकडेवारी पाहता २००१ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर २००२ व २००३ या वर्षात शेतकरी आत्महत्या झाली नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. त्यानंतर मात्र २००४ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही सुरू असून, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या प्रकरांमध्ये वाढ होत आहे. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१३ पर्यंत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होते. मात्र, २००४ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ८३ तर चालू वर्षात २०१९ मध्ये आजवर तब्बल १०८  शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रमाण मागील १९ वर्षात सर्वाधिक आहे. चालू वर्षातील १०८ पैकी ९० प्रकरणांमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर पाच प्रकरणे अपात्र ठरली असून, इतर १३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, जालना जिल्ह्यात यंदा १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन, प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


नैसर्गिक आपत्तीत १२ जणांचा बळी
जिल्ह्यात वीज पडल्याने, नदीत पडल्याने वाहून गेल्याने तब्बल १२ जणांचा बळी गेला आहे. यात जालना तालुक्यातील चौघांचा, भोकरदन तालुक्यातील चौघांचा तर जाफराबाद तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मयतांना प्रत्येकी चार लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासनाने गावस्तरावरही विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: During the year 108 farmer ended his life; Most farmers commit suicide this year from 19 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.