जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू
By दिपक ढोले | Updated: April 15, 2023 15:09 IST2023-04-15T15:08:58+5:302023-04-15T15:09:31+5:30
जालना तालुक्यातील मानेगाव येथील घटना

जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू
जालना : जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना मंदिराचा कळस जेसीबीवर कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील मानेगाव येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. प्रकाश भगवानराव जाधव (३५, रा. निरखेडा) असे मयताचे नाव आहे.
मानेगाव येथील हनुमान मंदिराचे बांधकाम जुने झाले होते. या मंदिराचा जीर्णेाद्धार करण्यासाठी जुने मंदिर पाडायचे होते. त्यानुसार प्रकाश जाधव हे शनिवारी सकाळी मंदिराच्या भिंती जेसीबीच्या साहाय्याने पाडत होते. या भिंती पाडत असतानाच, मंदिराचा कळस खाली जेसीबीवर कोसळला. मलब्याखाली दबल्याने प्रकाश जाधव गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, अशी माहिती मौजुपरी पोलिस ठाण्याचे सपोनि. योगेश धोंडे यांनी दिली.