पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा
By महेश गायकवाड | Updated: March 20, 2023 17:39 IST2023-03-20T17:38:14+5:302023-03-20T17:39:28+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्था कमजोर करुन ती बंद पाडण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा
जालना: शेतमजूर लाल बावटा युनियनच्या वतीने परतूर येथील तहसील कार्यालयावर घरकुल व रेशन दुकानातील धान्याच्या लाभासाठी मोर्चा काढण्यात आला. घरकुलाच्या अनुदानात वाढ करून ते ५ लाख रुपये करण्यासह रेशन दुकानात धान्याच्या बदल्यात पैशांऐवजी धान्यच देण्याची मागणी करण्यात आली.
मराठवाडा व विदर्भ दुष्काळ व आत्महत्याग्रस्त विभाग आहे. याचा गांभीर्याने विचार करून सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करावी. सर्वांना रेशन दरमहा किमान ३५ किलो वाटप करावे. महागाईच्या काळात मजुरांना घर बांधणे शक्य नाही. वाढलेल्या बांधकाम साहित्याचा विचार करून घरकुल बांधकामासाठी ५ लाखांचे अनुदान मंजूर करावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली. गॅसच्या सबसीडीप्रमाणे सरकार रेशनमधून मिळणाऱ्या धान्याऐवजी खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था कमजोर करुन ती बंद पाडण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
या मोर्चात मारोती खंदारे, सरिता शर्मा, भगवान कोळे, शेख महेमूद, मथुरा गोरे, शेख फरीदा, मनकरणा भालेकर, रेखा शेळके, आशामती उनवने, पार्वती आगलावे, शेखे फेरोज, शेख हबीब, वच्छला जाधव, नंदा हिवाळे, शितल पानझाडे, सारिका कोल्हे यांच्यासह मजूर महिला -पुरुषांचा सहभाग होता.