बर्ड फ्लूच्या अफवांना बळी पडू नका, मधुमक्षिका पालनावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:27+5:302021-02-07T04:28:27+5:30

कृषी विज्ञान मंडळाचे २८२ वे मासिक चर्चासत्र, बर्ड फ्लूबाबत केली जनजागृती जालना : बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये पसरणारा एक ...

Don't fall prey to bird flu rumors, guide farmers on beekeeping too | बर्ड फ्लूच्या अफवांना बळी पडू नका, मधुमक्षिका पालनावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बर्ड फ्लूच्या अफवांना बळी पडू नका, मधुमक्षिका पालनावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी विज्ञान मंडळाचे २८२ वे मासिक चर्चासत्र, बर्ड फ्लूबाबत केली जनजागृती

जालना : बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुएन्झा असे म्हणतात. हा आजार पक्ष्यांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरू शकतो. बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशुपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. यात लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. घाबरून न जाता, अफवांना बळी नये, असे आवाहन प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कृषी विज्ञान मंडळाच्या २८२ व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयसीएआर-अटारी, पुणे येथील संचालक डॉ. लाखन सिंग, स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील प्रा. डॉ. अनिल भिकाने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने हे उपस्थित होते.

डॉ. लाखन सिंग यांनी उद‌्घाटनपर मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान मंडळाद्वारे सातत्यपूर्ण होणाऱ्या चर्चासत्रांची प्रशंसा केली. अशाप्रकारे राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी रेशीम शेती, बांबू लागवड, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग सारखे आर्थिक उत्पन्न देणारे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. एस. व्ही. सोनुने हे प्रास्ताविक करताना म्हणाले की, बर्ड फ्लूच्या अफवांमुळे कोंबडी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. हाच गैरसमज दूर करण्यासाठी बर्ड फ्लूच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मधमाश्यांचे परागीभवनात महत्त्वाचे योगदान असून शेतकऱ्यांनी त्याकडे व्यवसाय म्हणून बघावे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मृद-शास्त्र विभागाचे प्रमुख राहुल चौधरी यांनी केले. आभार कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख अजय मिटकरी यांनी मानले.

विविध विषयांवर मार्गदर्शन

पीक उत्पादन वाढीत मधमाश्यांचे महत्त्व व मधुमक्षिकापालन या विषयावर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर, शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो आदीबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Don't fall prey to bird flu rumors, guide farmers on beekeeping too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.