शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:51+5:302021-03-17T04:30:51+5:30

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले ...

Don't be a farmer husband! | शेतकरी नवरा नको गं बाई !

शेतकरी नवरा नको गं बाई !

जन्मदरातील असमतोल : मुलीच्या मागण्या वाढल्याने वरपक्ष हैराण

जालना : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हणून त्याकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत विवाह संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. परंतु, सध्या बदलत्या संस्कृतीमुळे आणि आधुनिकपणाच्या रेट्यामुळे ती संस्था धोक्यात आली की काय? एवढी गंभीर परिस्थिती शहर आणि ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, प्रसंगी परदेशातील नोकरीला युवतींकडून प्राधान्य दिले जात असल्याने या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी अशी आपल्याकडे एक म्हण वास्तव अर्थाने रूढ झाली आहे. शेती हा मानवी जीवनाचा कणा समजला जातो. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे यात उत्पन्नाचा भरवसा नसल्याने शेती क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यातूनच उच्च शिक्षण घेऊन अनेक खेड्यांमधील युवक-युवती या पुणे, मुंबई यासह अन्य मोठ्या शहराकडे आकर्षिले जात आहे. तेथील चकाचक संस्कृती, जीवनशैली, सोयी-सुविधा याकडे तेथेच स्थायिक होण्याचा विचार वाढत आहे.

या विचारसरणीमुळे काळ्या मातीत राबणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांच्या विवाहाचा मोठा प्रश्न समाज व्यवस्थेसमोर निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

अटी मान्य असतील तरच बोला...

समाजातील मुला-मुलींच्या जन्मदराचे गुणोत्तर सध्या बिघडले आहे. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास एक हजार मुलामागे ९२० मुलींची संख्या आहे. त्यामुळे समाजासमोर विवाह जुळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासर्व अडचणी लक्षात घेऊन आणि भविष्याची चिंता व्यक्त करत मुली तसेच मुलींच्या आई-वडिलांकडून आता वर पक्षासाठी अनेक अटी घातल्या जात आहे. त्या पूर्ण करताना वर पक्ष नाकीनव येत आहे. काही दशकांपूर्वी याच अटी शर्ती वर पक्षाकडून घातल्या जात होत्या. त्यामुळे अडचणी वाढत होत्या.

सर्वाधिक मागणी डॉक्टरांना

n डॉक्टर, इंजिनियर यांसह अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांच्या तुलनेत डॉक्टर आणि इंजिनियर यांना मुली तसेच आई-वडिलांकडून मागणी वाढत आहे.

n मोठ्या शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने डॉक्टर आणि इंजिनियर यांच्यासह अन्य व्यावसायिकांकडे मुलींचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

n मध्यंतरीच्या काळात काही घटनांमधून आर्थिक चणचण, मुलींकडच्यांची आर्थिक लूट, अन्याय यामुळेदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील युवकांना पसंती दिली जात आहे.

पूर्वी ओळखीच्या आणि नातेवाइकांच्या मध्यस्तीने विवाह सोहळे पार पडत असत. परंतु आता विवाहसंस्था या विवाह जमविण्यासाठी महत्त्वाचा आणि खात्रीशीर घटक ठरत आहे.

-उषा देशपांडे,

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

एकूणच युवक-युवतींची आवड-निवड पूर्वीसारखी राहिली नसून, प्रत्यक्ष भेटणे आता शक्य नसल्याने सोशल मीडियावरूनच अनेकाचे विवाह जुळत आहेत. याला आता मान्यता मिळाली आहे.

- दक्षा लोदवाल

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

विवाह संस्थाच्या माध्यमातून खात्रीशीर स्थळ वधू आणि वरपित्यांना उपलब्ध होत आहे. त्यातून अनेकांना विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणी दूर होत असल्याने या संस्थानचे महत्त्व वाढले आहे.

-दीपक रणनवरे

वधू-वर सूचक मंडळाचे प्रमुख

मुलगा काय करतो, याची विचारणा केल्यावर तो नोकरीस नसेल असे समजल्यावर फारसे स्थळ येत नाहीत. शेती कितीही आधुनिक असली तरी विवाह जुळविताना अडचणी येतात.

- वरपित्याचा कोट,

मुलींचे लग्न जुळविताना आई-वडिलांकडून सर्व ती खबरदारी घेतली जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये मनस्ताप होतो. शेती करणाऱ्या युवकांचा त्रास यात आणखी वेगळा असतो.

-वधूपित्याचा कोट,

Web Title: Don't be a farmer husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.