‘दिखावे पर मत जाओ...अपनी अकल लढ़ाओ!’
By Admin | Updated: May 24, 2014 01:39 IST2014-05-24T01:13:08+5:302014-05-24T01:39:57+5:30
पंकज कुलकर्णी, जालना लहानांपासून मोठ्यांपर्यंत रंग सर्वांच्याच आवडीचे आहेत. ते जेवढे आकर्षक आहेत, तेवढेच आरोग्यासाठी घातक ठरत आहेत.
‘दिखावे पर मत जाओ...अपनी अकल लढ़ाओ!’
पंकज कुलकर्णी, जालना लहानांपासून मोठ्यांपर्यंत रंग सर्वांच्याच आवडीचे आहेत. ते जेवढे आकर्षक आहेत, तेवढेच आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. खाद्यपदार्थांमधून होत असलेला रंगांचा वापर आरोग्याच्या विविध समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. आजघडीला कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात रंग वापरलेल्या पदार्थांनी बाजारपेठा तुडुंब भरलेल्या आहेत. या खाद्य पदार्थांवर आपण येथेच्छ ताव मारतो. किंबहुना या पदार्थांच्या आकर्षक रंगाकडे आपण आपसूकच आकर्षित होतो. परंतु ते पदार्थ खाणे किती धोकादायक आहे, हे ते खाताना लक्षात येत नाही. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च (विष चिकित्सा संशोधन)’ या संस्थेतील वैज्ञानिकांनी भारतीय बाजारपेठांतील खाद्य पदार्थाचे नमुने तपासले. या सर्व नमुन्यांमध्ये मर्यादेच्या कितीतरी अधिक पटीने रंग वापरात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे १२ टक्के खाद्यपदार्थांमध्ये घातक रंग वापरात येतात. खाद्यपदार्थात वापरण्यात येणार्या रंगांचे दोन प्रकार आहेत. ‘फूड’ आणि ‘नॉनफुड कलर’ फूड कलर म्हणजे खाद्यपदार्थांमधून वापरण्यात येणारे रंग तर नॉन फुड कलर म्हणजे अन्नपदार्थांव्यतिरिक्त इतर बाबींसाठी असणारे कलर. अधिकृतरीत्या नैसर्गिक रंग वापरण्याचीच परवानगी अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. यामध्ये लाल, हिरवा, पिवळा या प्रकारचे आठ रंगांचा समावेश आहे. खाद्यान्न उद्योगात विविध वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादक, व्यापारी हे भरमसाठ रंगांचा वापर करीत आहे. त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. केशर, बीट, मिरची, हळद, स्ट्रॉबेरी यापासून बनविण्यात आलेल्या रंगांना प्रमाणित करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश खाद्य पदार्थांमधून ‘सिंथेटीक’ रंग वापरण्यात येत आहेत, ते धोकादायक आहेत. रोडामाईन बी (लाल), आॅरेंज -२ (केशर), मेटानील यलो (पिवळा), सुदान-आय (केशरी/लाल), मेलाशाईट ग्रीन (हिरवा), अॅमरानथ (लाल) हे रंग खाद्यपदार्थांमध्ये वापरात येतात. विशेष म्हणजे यामधील काही रंगांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या रंगांमुळे वाढ खुंटणे, अॅनिमिया, किडनी, लिव्हरचे आजार, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, रक्ताशयापासून कर्करोगापर्यंतचे आजार संभवतात. समारंभांमधून विविध रंगांच्या सरबतांसह खाद्यपदार्थ पहावयास मिळतात, परंतु त्यामध्येही घातक रंगाचाच वापर केला जातो. ढाबे, हॉटेल्समधील चिवडा, बुंदीसह काजुकरी, पालकपनीर, नवरतन कोरमा, तिरंगा यासारख्या भाज्यांत धोकादायक रंग वापरले जातात. दैनंदिन वापराच्या मिरची पावडर, मसाले, बडीशोपमध्येही रंगांचे प्रमाण अधिक आहे. मिरची पावडरमध्ये ‘लेडक्रोमेट’ तर हैद्रबादी बडीशोपला हिरवागार दिसण्यासाठी रंग देण्यात येतो, त्यामुळेच ग्राहक आकर्षित होतात.फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्डझ् अॅथॉरिटी आॅफ इंडिया या संस्थेने सर्वसाधारणपणे दररोज किती प्रमाणात रंग सेवन करावे, याचे परिमाण दिले आहे. प्रत्येकाने दिवसाला १०० मिलीग्रॅम/ किलो एवढ्या प्रमाणात रंग घेतल्यास ते हानीकारक ठरत नाही. असे असले तरी जालना जिल्ह्यात रंगांचे प्रमाण मोजण्यासाठी प्रयोगशाळा किंवा कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतच नमुने पाठवावे लागतात. यासाठी शासनाने जिल्हास्तरावर प्रयोगशाळा स्थापन कराव्यात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.अन्न व औषध प्रशासन किंवा शासनाने विविध खाद्यपदार्थात कोणते व किती प्रमाणात वापरायचे याचे निर्देश दिले असले तरीही स्वीटमार्ट, ज्युस सेंटर्स तसेच इतर किरकोळ विक्रेत्यांकडे त्याचे कुठलेच परिमाण नाही. पेढे, जिलेबी आदी गोड पदार्थ बनविताना आकर्षक दिसेपर्यंत रंग टाकण्यात येतो. त्याचे प्रमाण ठरलेले नसते. रंगाकडे आकर्षित होण्याचे टाळत कमीत कमी रंग असलेले पदार्थच घ्यावेत, जेणे करून आरोग्याच्यादृष्टीने ते फायदेशीर ठरेल. मुलांचा हट्ट पुरविताना त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रंगाच्या धोक्यांबद्दल नागरिकांसह सामाजिक संस्था व विक्रेत्यांमध्येही जनजागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे मत मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.