District's attention to counting; Admin ready | मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष; प्रशासन सज्ज

मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष; प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील जालना वगळता अन्य चार मतदारसंघांत मतदारांनी पावसाची तमा न बाळगता भरभरून मतदान केले. जालन्यात गेल्यावेळपेक्षा चार टक्क्यांनी मतदान कमी झाले. जालन्यातील शहरी मतदारांनी मतदान न करणेच पंसद केले आहे. या कमी मतदान झाल्याचा फटका कोणाला बसतो हे गुरूवारी पुढे येणार आहे.
निवडणूक विभागासह अन्य राजकीय पक्षांनी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते. संकल्पपत्र भरून घेण्यासह पथनाट्य आणि अन्य उपक्रमांतून जागृती केली होती. असे असतांनाही जालन्या सारख्या शहरात मतदारांचा निरूत्साह दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालना वगळता परतूर, घनसावंगी तसेच बदनापूर आणि भोकरदन या विधानसभा मतदारसंघात मात्र, मतदारांनी घराबाहेर पडून आपला हक्क बजावाला.
वॉच टॉवरसह सीसीटीव्हीची नजर
जालन्यात मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वॉच टावरसह सीसीटीव्हीच्या नजरेत ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी तीन प्रकारचे कवच तयार करण्यात आले आहे. पहिल्या कवचमध्ये केंद्रीय पोलीस दलाचे २५ कर्मचारी, दुसऱ्या कवचमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे १२ तर तिसºया कवचमध्ये राज्य पोलीसचे १२ कर्मचारी आहेत.
परतुरात तयारी
परतूर : परतूर येथे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी चार वॉच टॉवर उभारण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दल व राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी येथे पाहारा देत आहे. या मतदारसंघात ३२५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सर्व ईव्हीएम मशीन परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक व पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी २ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक, सीमा सुरक्षा दलाची एक व राज्य राखीव दलाची एक अशा दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच २४ पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी खास चार वॉच टॉवर तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोपान बांगर, गोपनीय शाखेचे प्रल्हाद गुंजकर यांनी दिली.
घनसावंगीत जवानांसह शंभर पोलीस कर्मचारी
घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ३३९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. घनसावंगी मतदार संघात सवार्धिक ७३ टक्के मतदान झाले. सर्व केंद्रावरील ईव्हीएम मशीन घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ठेवण्यात आल्या आहे. या मशीनच्या सुरक्षेसाठी १ पोनि. आय एस पथक, एक एस आरपीएफची तुकडी व १०० स्थानिक पोलीस कर्मचारी पाहारा देत आहेत.
कृषी विद्यालयात तयारी
बदनापूर मतदारसंघाची मतमोजणी ही कृषी महाविद्यालयात होणार आहे. यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था केली आहे. सीआरपीएफचे जवान तसेच राज्य पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. या सर्व प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी तसेच तहसीलदार छाया पवार या जातिने लक्ष ठेवून ओहत.
तयारी : भोकरदन येथे २४ कर्मचा-यांसह जवान तैनात
भोकरदन : भोकरदन येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १ अधिकारी व २४ कर्मचा-यासह १ एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी दिली.
भोकरदन विधानसभा मतदारसंघातील ३२२ मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान पार पडले. ३ लाख ५ हजार ७०९ मतदारांपैकी २ लाख १५ हजार ७८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, सर्व ईव्हीएम मशीन नगर परिषदेच्या मंगल कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: District's attention to counting; Admin ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.