प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; दहा ट्रॅव्हल्सवर कारवाई, २३६ चालकांची मद्यपान तपासणी
By दिपक ढोले | Updated: July 29, 2023 15:43 IST2023-07-29T15:42:56+5:302023-07-29T15:43:16+5:30
ज्या प्रवासी बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजात अडथळा झाला होता, अशा बसेसची सीट काढून बसेस रवाना करण्यात आल्या.

प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; दहा ट्रॅव्हल्सवर कारवाई, २३६ चालकांची मद्यपान तपासणी
जालना : सुरक्षित बस प्रवासासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत शनिवारी विशेष बस तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत २८ बसेसची तपासणी करण्यात आली असून, त्यात १० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, २३६ चालकांची मद्यपान तपासणी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात होऊन जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या अनुषंगाने परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओ कार्यालयांना बसेसची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जालना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष मोहीम राबवून बसेसची तपासणी केली जात आहे. शनिवारी वायुवेग पथकामार्फत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत २८ बसेसची तपासणी करण्यात आली. आपत्कालीन दरवाजामध्ये अडथळा, प्रथमोपचार पेटी नसणे, अग्निशमन यंत्रणा नसणे आदी सुरक्षा बाबतीत दोषी असणाऱ्या एकूण १० बसेसवर कारवाई करण्यात आली. बस चालविणाऱ्या एकूण २३६ चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे मद्यपान तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ४१ हजार इतका तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. १ लाख ६७ हजार ७५५ इतका कर वसूल करण्यात आला. ज्या प्रवासी बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजात अडथळा झाला होता, अशा बसेसची सीट काढून बसेस रवाना करण्यात आल्या. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे, अनुराधा जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक राजकुमार मुंढे, प्रणव चव्हाण, सुनील गिते, चैत्राली इंगळे यांनी केली आहे.