समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By विजय मुंडे | Updated: April 27, 2024 19:31 IST2024-04-27T19:31:25+5:302024-04-27T19:31:34+5:30
कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जालना : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहनांचे डिझेल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा महामार्ग सुरक्षा पथकाने शुक्रवारी रात्री पर्दाफाश केला आहे. चोरीच्या ४५० लिटर डिझेलसह एक कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर होते. त्यांना समृद्धी मार्गावरील नागपूरकडून मुंबईकडे जालना एक्झिट टोलनाक्याजवळ एका साईडला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्र. एमपी. ०४, सीएफ-३६४१) उभी होती. त्या कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता, कारमध्ये ३५ लिटरच्या डिझेलने भरलेल्या १३ कॅन, म्हणजे ४५५ लिटर डिझेल आढळून आले. वाहनांच्या टॅंकमधून डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप व साहित्य आढळून आले. यावेळी पोलिसांनी शिवनारायण भिल्ल (वय ३८), धर्मराज गणेश मांडोर (वय २०, दोघेही रा. शाजापूर जिल्हा, म.प्र.) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुद्देमालासह आरोपींना चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक अनिता जामदार, पोलीस उपअधीक्षक डिसले, पोलीस निरीक्षक गिरी, प्रभारी अधिकारी कल्पना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस हवालदार यशवंत मुंडे, संदीप बिऱ्हाडे, रोहन बोरसे, ज्ञानेश्वर खराडे माऊली, चालक विनोद भानुसे आदींनी केली.