कपाशी पीक तात्काळ नष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:49 IST2018-03-07T00:49:12+5:302018-03-07T00:49:45+5:30
जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कपाशी पीक तात्काळ नष्ट करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या जनजागृती चित्ररथाची सोमवारी कृषी कार्यालयापासून जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुुरुवात करण्यात आली.
कृषी विभाग व अजित सीड्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या जनजागृती रथाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे, पणन व्यवस्थापक भोसले, अप्पासाहेब संत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात मागील वर्षी दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पीक बोंडअळीमुळे बाधित झाले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. आगामी हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशी पीक उपटून नष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शेतक-यांनी फरदड कापसाच्या मोहात कपाशी पीक शेतातच ठेवले आहे. कपाशी पीक लगेच नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, असे कृषी अधिकारी तांभाळे यांनी सांगितले.