जालना : आज वैद्यकशास्त्राने विज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे ॲलोपॅथीला जगमान्यता मिळाली असून, यातून लवकरात लवकर आजारातून मुक्त होता येते हे खरेही आहे. परंतु ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते त्यावेळी मानवाने निसर्गातील विविध वनस्पतींचा औषधी म्हणून उपयोग होऊ शकतो हे सिद्ध करून निरोगी आयुष्य जगू शकतो, हेही दाखवून दिले आहे.
आज प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघर हे असतेच. या स्वयंपाकघरातील तिखट-मिठाचा डब्बा म्हणजे एक प्रकारे औषधांचा डबा म्हणून त्याची ओळख आहे. भाजी चिरताना अथवा अन्य कुठलेही काम करताना रक्त निघाल्यास लगेचच हळदीची पूड अथवा त्यावर चुना लावून ते थांबविले जात. लहान मुलांना खोकला आल्यास लगेचच हळद, दूध आणि गूळ टाकून ते तीन ते चार दिवस दिल्यावर खोकला थांबत असे. यासह घरात लवंग, इलायची, सुंठ, जीरे, मिरे याही औषधीच आहेत. मसाल्यांच्या पदार्थातील वनस्पतींचा सहभागही महत्त्वाचा ठरतो. घशात खवखव होत असल्यास सकाळी उठून मिठाच्या पाण्याच्या गुळणी केल्यास लगेचच घसा मोकळा होतो. त्यामुळे आजी बाईचा बटवा म्हणजेच घरातील उपचार पद्धती ही कोरोनापासून दूर ठेवते.
आजीबाईंच्या बटव्यात काय?
कोरोनाचा आजार हा नेमका सर्दी आणि खोकल्यासारखा आहे. वेळीच काळजी घेतल्यास त्यातून बरे होता येते. याची तीव्रता ही तीन दिवस असते. परंतु आता अनेक जण धीर सोडत असल्याने चिंता वाढली आहे. सर्दीला न घाबरता इलाज केल्यास कोरोना होऊ शकत नाही, हा अनुभव आहे. - कडूबाई गाढे, भाटेपुरी
आजच्या आजारांवर मात करण्यासाठी लगेचच बाजारात जाऊन औषधी आणल्या जातात. परंतु जुन्या काळात हे शक्य नव्हते. त्यामुळे आधी घरगुती इलाजवर भर दिला जात होता. न राहिल्यास नंतरच वैद्यांकडे नेले होते. त्यामुळे आधीची घरे ही जुन्या औषधांनी भरलेली होती. - शांताबाई रत्नपारखी, जालना
जुन्या काळात महिला असो की, पुरुष हे सहनशील होते. किरकोळ दुखण्यांना ते जुमानात नसत. कारण ते चालणे, शेतात कामे करणे अशी कष्टांची कामे करत. आज सर्वत्र अल्हादपणा आला आहे. त्यामुळे सहनशीलता कमी झाल्याने दुखणी वाढत असल्याचे चित्र आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. - इंदूबाई इंगळे, जालना
आजचे युग हे इन्स्टंटचे आहे. एखाद्याला दोन ते तीन वळेस प्रयत्न करूनही मोबाईल लागला नाही की, चीड येते. तसे आयुर्वेदाचे नाही. यातील उपचार पद्धतीसाठी नाडीपरीक्षा केली जाते. तसेच दिलेली औषधी ही किमान आठ ते पंधरा दिवस घेतल्यावर त्याचे परिणाम दिसतात. परंतु आज वेळेचा अभाव असल्याने इन्स्टंटला महत्त्व आले. परंतु आयुर्वेदाचे महत्त्व पूर्वीही होते आणि ते कायम राहील हे कोरोनाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. - डॉ. अनुप कोहाळे, आयुर्वेदिक तज्ज्ञ
कशाचा काय फायदा?
हळदीचे महत्त्व पटले
कोरोना काळात सर्वात जास्त मागणी वाढली ती हळदीची. यातील पोषक घटकांमुळे सर्दी, खोकल्यापासून बचाव होतो. तसेच जीवनसत्व वाढीसाठीदेखील हळद महत्त्वाची ठरते. हळद प्रशानाने प्रतिकारशक्तीत वाढ होते.
बहुउपयाेगी लवंग
लवंग हा गरम पदार्थ म्हणून ओळखला जातो. कुठल्याही मसाल्यांमध्ये लवंगेचा वापर हा ठरलेला असतो. मळमळ, उलटी होत असल्यास लवंग चघळल्यास चांगला परिणाम होतो. कोरोनामुळे याची मोठी मागणी वाढली आहे.
बहुगुणी मीठ
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा खूप प्राचीन इलाज आहे. घशात खवखव होत असल्यास कोमट पाण्यात मीठाची चिमूट टाकून गुळणी केल्यास घशातील खवखव ही अर्धा तासांत कमी होऊन हमखास आराम पडतो.