शिवीगाळ केल्या प्रकरणी बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:04 IST2019-06-18T19:03:10+5:302019-06-18T19:04:47+5:30
पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल

शिवीगाळ केल्या प्रकरणी बेदम मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू
जालना : शिव्या दिल्याच्या कारणावरून सोमवारी जालना शहरातील खांडसरी भागातील सय्यद शफीक सय्यद इसाक (३५) यास काहीजणांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण झाली होती. जखमी अवस्थेत शफीक यास रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद शफिक सय्यद इसाक यांनी केलेल्या शिवीगाळीच्या कारणावरुन आरोपी श्रावण उर्फ पिंट्या सिताराम काळे, बबन काळे, संदीप शंकर जाधव यांनी गैरकायद्याने मंडळी जमवली. व सय्यद शफिक सय्यद इसाक यास लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर शफिक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सय्यद शफिक सय्यद इसाक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा भाऊ सय्यद अतिक सय्यद इसाक (३० रा. खांडसी) यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन आरोपी अटकेत
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात आरोपी श्रावण काळे यास जालना रेल्वेस्थानक येथुन पकडले. दुसरा आरोपी संदिप जाधव यास कोडी (कारला) रेल्वेस्टेशन येथुन ताब्यात घेतले. तसेच तिसरा आरोपी बबन काळे यास रेल्वेपुलाजवळ पकडले. ही कारवाई एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पो.नि. संजय देशमुख, पोउपनि. विजय जाधव, निशा बनसोड, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस, किरण चेके, फुलचंद गव्हाणे, मनोहर भुतेकर यांनी केली आहे.