दहा एकरांवरील कपाशीवर फिरविला नांगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:38 AM2019-07-24T00:38:29+5:302019-07-24T00:38:56+5:30

वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला.

Cultivated plow on ten acres of cotton .. | दहा एकरांवरील कपाशीवर फिरविला नांगर..

दहा एकरांवरील कपाशीवर फिरविला नांगर..

Next

राजू छल्लारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : पावसाच्या एका सरीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला पेरलेल्या पांढऱ्या सोन्याची चिंता लागून आहे. याच चिंतेतून अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला.
वडीगोद्री येथील शेतकरी विनोद पिंगळे यांनी त्यांच्या वडीगोद्री व सौंदलगाव शिवारातील १० एकर परिसरावर जुलै पहिल्या आठवड्यात मोठ्या उमेदीने कपाशीची लागवड केली होती. लागवडीनंतर रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी माना वर काढल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु जवळपास २० दिवस पावसाचा खंड पडल्याने माना वर काढलेली पिके कोमेजली होती. आता पुन्हा केव्हा वरूणराजा कृपा करणार आणि पुन्हा आपले शेत हिरवे होणार, या चिंतेने विनोद पिंगळे हे व्यथित झाले होते.
एकूणच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी झळा सहन करत शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागतो, उसनवारी करून बी-बियाणे, खते खरेदी करून मोठ्या कष्टाने पेरणीही करतो. परंतु पाऊस लांबल्याने त्याच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले जाते. अशीच परिस्थिती वडीगोद्री, सौंदलगाव परिसरात दिसून आली. यातूनच हताश झालेल्या पिंगळे यांनी २३ जुलै रोजी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविला.
यामुळे जवळपास ६० हजार रूपयांचा पेरणीचा खर्च वाया गेला असून, दुबार पेरणीही आता शक्य नसल्याने रान मोकळे ठेवण्याची वेळ पिंगळे यांच्यावर ओढवली आहे. येत्या आठवडाभरामध्ये जर दमदार पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांवर अशीच नांगर फिरविण्याची वेळ येणार असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कृत्रिम पावसाची गरज
राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाच्या घोषणा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मध्यंतरी औरंगाबादेतून कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून यंत्रणाही हलली होती. या पावसासाठी लागणारे तांत्रिक साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे वातावरणही सध्या किमान जालना जिल्ह्यात दिसून येत नाही.
सोलापूर आणि त्या भागामध्ये मंगळवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्याची माहिती देण्यात येत आहे. परंतु जालना, औरंगाबाद या भागात हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबद्दलही शंका घेतली जात आहे.
दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही. किती दिवस दुबार पेरणी केली तर चालेल, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपले शेत आता खरिपाऐवजी रबी हंगामासाठी तयार करून ठेवले आहे.

Web Title: Cultivated plow on ten acres of cotton ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.