मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू; आयोजकांनी स्पर्धा थांबवली, बक्षीस मृताच्या कुटुंबीयांना देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:11 IST2025-06-19T16:11:12+5:302025-06-19T16:11:57+5:30

गोलंदारी करताना हृदयविकाराचा झटका, क्रिकेटपटू सोमिनाथ बहादुरेची आयुष्याच्या मैदानातून एक्झिस्ट

Cricketer dies on the field; Organizers stop competition, prize will be given to the deceased's family | मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू; आयोजकांनी स्पर्धा थांबवली, बक्षीस मृताच्या कुटुंबीयांना देणार

मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू; आयोजकांनी स्पर्धा थांबवली, बक्षीस मृताच्या कुटुंबीयांना देणार

भोकरदन : भोकरदन येथे सुरू असलेल्या पंचायत राज क्रिकेट चषक-२०२५ स्पर्धेत गोलंदाजी करताना खेळाडू सोमिनाथ बहादुरे यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि ते जागेवरच कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्पर्धा रद्द करण्यात आली असून नियोजित बक्षिसाची रक्कम बहादुरे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेणात आला.

१३ जूनपासून सुरू झालेली ही स्पर्धा रात्रीच्या सत्रात होत होती. १६ जूनच्या रात्री आठ वाजता सुरू असलेल्या सामन्यात, ३५ वर्षीय सोमिनाथ बहादुरे हे गोलंदाजी करत असताना अचानक कोसळले. उपस्थित खेळाडूंनी व आयोजकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण मैदानात व प्रेक्षकांत शोककळा पसरली. स्पर्धा तत्काळ थांबवण्यात आली आणि सर्व खेळाडू व आयोजकांनी सोमिनाथ बहादुरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. 

दुसऱ्या दिवशी, १७ जून रोजी लहानेवाडी (ता. फुलंब्री) येथे शोकमय वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचायत राज चषकातील उर्वरित सर्व सामने रद्द करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी ठेवलेल्या बक्षिसाची रक्कम सोमिनाथ बहादुरे यांच्या मुलांना देण्यात येणार असल्याचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजक दीपक मोरे यांनी सांगितले.

Web Title: Cricketer dies on the field; Organizers stop competition, prize will be given to the deceased's family

टॅग्स :Jalanaजालना