coronavirus : राखीव दलाचे ६४ जवान भोकरदनमध्ये क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 19:25 IST2020-05-08T19:25:05+5:302020-05-08T19:25:27+5:30
या सर्व जवानांना सुरक्षित अंतराचे बंधन घालण्यात आले असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे

coronavirus : राखीव दलाचे ६४ जवान भोकरदनमध्ये क्वारंटाईन
भोकरदन : मालेगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या जालन्यातील राज्य राखीव पोलीस दलातील ६१ जवान आणि तीन अधिकारी पोलीस व्हॅनव्दारे शुक्रवारी सायंकाळी भोकरदनमध्ये पोहचले. त्यांना येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.
मालेगाव हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोनमध्ये येते. तेथून हे जवान येणार असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मोठी खबदारी घेतली आहे. या जवानांना जालन्यात आणण्या पेक्षा सुरक्षेसाठी म्हणून भोकरदन येथेच त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय बिनवडे यांनी घेतला होता. त्यानुसार तशा सूचना त्यांनी महसूल तसेच आरोग्य विभागाला दिल्या होत्या. या सूचनेनुसार शुक्रवारी सायंकाळी पोलीस व्हॅनमधून हे सर्व जवान मोलगाव येथून भोकरदनमध्ये दाखल होताच त्यांची रवानगी येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर वसतीगृहात करण्यात आली आहे. सध्या या वसतीगृहाला कोविड सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे.
या सर्व जवानांना सुरक्षित अंतराचे बंधन घालण्यात आले असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी आणि तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली. दरम्यान ज्या वसतीगृहात या जवांनाना मुक्कामी ठेवले आहे, त्या परिसरातील नागरिकांमध्ये मात्र, भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. हे जवान या परिसरात आता १४ दिवस राहणार आहेत.