Complete linking of 4000 farmers base | २४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण
२४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. तर अद्यापही ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्जखात्याशी लिंक करण्याचे काम सुरू आहे.
शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व परतफेड न केलेले अल्पमुदती पिककर्ज, पुनर्गठीत पिककर्ज, फेर पुनर्गठीत पिककर्ज असलेले २ लाख ४ हजार ४६२ शेतकरी जालना जिल्ह्यात आहेत. पैकी १ लाख ७२ हजार ९०८ शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक होता. मात्र, ३१ हजार ५५४ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक झालेला नव्हता. शासन निर्देशानुसार आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक नसलेल्या शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.
याद्या प्रसिध्द झाल्यानंतर आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतक-यांनी आपला आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक करून घेतला आहे. 
६ हजार शेतक-यांचे काम अद्याप अपूर्ण
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय निकषात असलेल्या शेतक-यांनी आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत अद्यापही जालना जिल्ह्यातील ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न झालेला नाही. यात सर्वाधिक एसबीआयचे १९४५ तर जिल्हा बँकेतील १४११, युनियन बँक आॅफ इंडियातील ११६४ शेतक-यांसह इतर बँकेतील शेतक-यांचा यात समावेश आहे.
नियमित कर्ज फेडणारे
२ लाख शेतकरी
जिल्हा बँकेंतर्गत कर्ज घेतल्यानंतर ते नियमित फेडणा-या शेतक-यांची संख्या २ लाख १६ हजार २३१ इतकी आहे. या शेतक-यांनी ३७७ कोटी ९९ लाख ६३ हजार रूपयांचे कर्ज फेडले आहे. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांसाठी विशेष योजना जाहीर केली तर तब्बल २ लाख १६ हजार २३१ शेतक-यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Complete linking of 4000 farmers base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.