लेकरा परत ये रे...विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेला अन् मृतदेहच दारात आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:25 IST2025-07-04T16:18:21+5:302025-07-04T16:25:01+5:30
दिंडीत हरवलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्याने आईने एकच हंबरडा फोडला.

लेकरा परत ये रे...विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेला अन् मृतदेहच दारात आला
अंबड (जि. जालना) : विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरीकडे गेलेल्या गोविंदचा मृतदेहच बुधवारी मध्यरात्री झिरपी येथील घरी आणण्यात आला. दिंडीत हरवलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. लेकरा परत ये रे... अशी आर्त साद घालणाऱ्या आईचा हंबरडा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
गोविंद ऊर्फ आकाश कल्याण फोके (वय १९, रा. झिरपी, ता. अंबड) असे मयताचे नाव आहे. घुंगर्डे हदगाव येथील हभप विष्णू महाराज मस्के यांच्या दिंडीत १८ जूनपासून गोविंद फोके हा त्याची आजी प्रयागबाई खराबे यांच्यासोबत गेला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीमधील १२ नंबरची ती दिंडी होती. गोविंद यंदा प्रथमच दिंडीत सहभागी झाला होता. परंतु, १ जुलै रोजी सकाळी माळशिरस तालुक्यातील सराटी गावाजवळील नीरा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर गोविंद नदीपात्रात बुडाला होता. घटनेच्या ३६ तासांनंतर बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास गोविंदचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्या वेळी आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाचा मृत्यू झाला, यावर त्या आईचा विश्वास बसत नव्हता. शोकाकुल वातावरणात गोविंदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई-वडील आजारी
मुलगा दिंडीत हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर गोविंदच्या आईची प्रकृती खालावली होती. दोन वेळेस त्यांना डॉक्टरांकडे न्यावे लागले. वडिलांचीही प्रकृती बुधवारपासून खालावली होती. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने फोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संपूर्ण गाव जागलं
गोविंदचा मृतदेह सापडल्याची माहिती झिरपी गावात मिळाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मध्यरात्रीच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांना होती. त्यामुळे मृतदेह गावात येणे आणि अंत्यसंस्कार होईपर्यंत गावातील सर्वच मंडळी जागी होती.
...अन् मनात पाल चुकचुकली
गोविंद बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे, अशीच माहिती त्याच्या आईला देण्यात आली होती. परंतु, बुधवारी रात्री घराकडे येणाऱ्या नातेवाइकांचा ओढा वाढल्याने आईच्या मनात पाल चुकचुकली. माझ्या लेकराला काय झालं असेल? असं त्या विचारत होत्या.
कुटुंबाला मदत द्या : नारायण कुचे
नीरा नदीपात्रात बुडून मयत झालेल्या गोविंद फोके याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी विधिमंडळात केली आहे.