आठ विभागांतून ११५ टन कचऱ्याचे संकलन ; गाड्यांना समस्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:35+5:302020-12-28T04:16:35+5:30
जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटाविला आहे. शहर स्वच्छतेकडे पालिकेचे विशेष लक्ष आहे. मात्र, घंटागाड्यांमध्ये ...

आठ विभागांतून ११५ टन कचऱ्याचे संकलन ; गाड्यांना समस्यांचे ग्रहण
जालना : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटाविला आहे. शहर स्वच्छतेकडे पालिकेचे विशेष लक्ष आहे. मात्र, घंटागाड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुुळे काही भागात दैनंदिन घंटागाड्या पाहोचत नाहीत. त्यामुळे तांत्रिक समस्या सोडविण्यासह घंटागाड्यांची संख्या वाढविणेही गरजेचे आहे.
बाजारपेठेसह शहर स्वच्छतेसाठी ५० घंटागाड्या आहेत. त्यात काही घंटागाड्या सतत तांत्रिक अडचणींमुळे बंद असतात. घंटागाड्या बंद राहत असल्याने काही भागात दैनंदिन कचरा संकलित करता येत नाही. दुसरीकडे कार्यरत इतर घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील कचरा संकलित होतो. तर बाजारपेठेत दोन वेळेस कचरा संकलित केला जातो.
वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा
शहराच्या विविध भागांत दररोज सकाळी व सायंकाळी कचऱ्याचे संकलन केले जाते. घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याद्वारे नियंत्रण राहते.
शहरातील आठ विभागांत आठ स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार हे अधिकारी त्या- त्या भागात जाऊन कामे करून घेत आहेत.
जमा झालेल्या कचऱ्याचे सेप्रेशन करण्यासह खतप्रक्रिया सुरू
शहरातील विविध भागांतून जमा करण्यात येणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जातो. डम्पिंग ग्राऊंडवरील यंत्रणेच्या माध्यमातून नष्ट न होणारा कचरा हा वेगळा केला जात आहे. इतर कचऱ्यांतून खतनिर्मितीची प्रक्रिया केली जात आहे.
नगरपालिकेने सामनगाव येथेही कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही प्रमाणात येथे खतनिर्मिती करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. घरोघरी रोज घंटागाडी जावी, यासाठी नियोजन केले आहे. बाजारपेठेतील कचरा नियमित दोन वेळेस संकलित केला जातो. शहरातील आठ विभागांत स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत तक्रारींचे निवारण केले जाते. शिवाय कचऱ्यापासून खतनिर्मितीही केली जाते.
- राहुल मापारी, न. प. स्वच्छता अभियंता