लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:55 IST2020-04-20T00:54:17+5:302020-04-20T00:55:07+5:30
जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.

लॉकडाऊननंतरही उद्योगांवर राहणार चिंतेचे ढग
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनदरम्यान उद्योग, कारखाने बंद असल्याने जळगावात आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊननंतर मजूर परतण्याची चिंता आहे. जळगावात चटई उद्योग मोठा असल्याने सीमाबंदी राहिल्यास कच्च्या मालाचाही तुटवडा भासणार असल्याची चिंता उद्योजकांना आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जळगावात छोटे-मोठे मिळून जवळपास १४०० उद्योग असून, यात बहुतांश उद्योग हे प्लास्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. हा उद्योग मशिनरीपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून आहे. येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून, यातील ५० टक्के परप्रांतीय आहेत.
चटईची निर्यात थांबणार?
चटईची परदेशवारी थांबण्याची भीती देशभरातील प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो. येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केली जाते. त्यामुळे जळगावची ओळख ‘चटई हब’ म्हणूनदेखील आहे. आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते.