शहरातील नर्सरी, केजीच्या २५ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST2021-05-26T04:30:56+5:302021-05-26T04:30:56+5:30
जालना : पूर्वीच्या बालवाडी म्हणजेच आताच्या जमान्यातील नर्सरी अशी ओळख या शाळांची निर्माण झाली आहे. इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने या ...

शहरातील नर्सरी, केजीच्या २५ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?
जालना : पूर्वीच्या बालवाडी म्हणजेच आताच्या जमान्यातील नर्सरी अशी ओळख या शाळांची निर्माण झाली आहे. इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने या इंग्रजी शाळांची शहरासह ग्रामीण भागातील संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. परंतु गेल्या दीड वर्षापासून या शाळा बंद आहेत. त्या जूनमध्येही सुरू होतील की नाही, याबाबत शंका आहे.
जालना शहरात जवळपास ११४ पेक्षा अधिक लहान मोठ्या नर्सरी, केजीच्या शाळा आहेत. यामध्ये गेल्या वर्षभरापासून या शाळांची मैदाने आणि वर्ग हे मुलांच्या किलबिलाटाने गजबजलेच नाहीत. कोरोनामुळे मोठे नागरिक त्रस्त असताना लहान मुलांना शाळेत कसे पाठवायचे, या भीतीने देखील अनेकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश दिला नाही. त्यातच सरकारने देखील शाळा बंद ठेवल्याने या नर्सरी, केजी शाळांचे दरवाजे बंदच होते. जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होते. परंतु यंदा ही आशाही मावळण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष करून या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही या शाळा उघडतील अशी शक्यता धूसर आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची मोठी अडचण निर्माण झाली असून, बच्चे कंपनीदेखील घरात बसून आता कंटाळली आहे.
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; ही घ्या काळजी
शाळांमध्ये विद्यार्थी लहानपणापासून गेल्यास त्यांच्या एकूणच शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये आमूलाग्र बदल होतात. एकमेकांच्या सहवासात आल्याने मुलांचे एकटेपण दूर होते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवून जर या शाळा सुरू झाल्यातर सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
- डॉ. संजय जगताप, मानसोपचार तज्ज्ञ
गेल्या वर्षभरापासून माझी मुलगी घरातच आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्यांच्या हसण्या, बागडण्यावर मर्यादा आल्या आहेत. तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणत्तेवरही विपरित परिणाम होत आहे.
- जकी सौदागर
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे माझी दोन्ही मुले घरीच आहेत. यंदा शाळा सुरू होण्याची आशा व्यक्त होत आहे. परंतु लहान मुलांनाच संसर्गाचा धोका जास्त असल्याचे पुढे येत असल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नंदू जावळे
पूर्वी बालवाडी आणि पहिली दुसरीच्या शाळा मराठीतच विद्यादान करणाऱ्या होत्या. परंतु काळानुरूप यात बदल झाले असून, गेल्या २५ वर्षात नर्सरी, केजी या शाळांना महत्त्व आले आहे. यातून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे चटकन आकलन होते.
- खमर सुलताना, चालक
कोरोनामुळे नर्सरी, केजीच्या शाळा गेल्या दीड वर्षापासून उघडल्या नाहीत. आगामी शैक्षणिक वर्षातही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झााली.
- अलका गव्हाणे, चालक
मुलांना इंग्रजी यावे, या हेतूने सर्व पालकांचा ओढा आता केजी आणि नर्सरीकडे वळला आहे. असे असले तरी कोरोनाचा फटका या शाळांनाही बसल्याने मुले घरीच आहेत.
- रेखा चंद्रकांतराव देशपांडे