City councilor aggressive from dengue in the city | जालना शहरातील डेंग्यूवरून नगरसेवक आक्रमक
जालना शहरातील डेंग्यूवरून नगरसेवक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरांतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून नगर पालिकेने मलमपट्टी केली. मात्र, मुरूमामुळे उडणाऱ्या धुराळ्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यूचा फैलाव झाला असला तरी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सुरळीत काम करीत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी मंगळवारी आयोजित पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या.
वाढते आजार लक्षात घेता वेळेवरच उपाययोजना कराव्यात, प्रत्येक प्रभागाला फॉगिंग मशीन द्यावी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची त्या-त्या झोनमध्ये हजेरी घ्यावी, रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजवावेत, विशेष म्हणजे प्रशासनावर अधिकारी, पदाधिकाºयांनी वचक ठेवावा, आदी मागण्यांसाठी उपस्थित नगरसेवक, नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली टाऊन हॉलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी सकाळी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह सभापती, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नगरसेवक विजय पवार, शहा आलमखान यांच्यासह इतर नगरसेवकांनी शहरात फैलावलेल्या डेंग्यूला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रभागांमध्ये स्वच्छता होत नाही, फॉगिंग मशीन नसल्याने धूरफवारणी होत नाही, आदी तक्रारी मांडल्या. शहा आलम खान यांनी झालेल्या वार्षिक कराराचे ई-टेंडरिंग झाले का असा सवाल उपस्थित केला. मात्र, यावर नंतर माहिती मिळेल, असे उत्तर त्यांना मिळाले. अमीर पाशा यांनी कर्तव्यावर मयत झालेल्या कर्मचा-याला पालिकेने मदत करण्याचा विषय मांडल्यानंतर संबंधितास नियमानुसार मदत करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षांकडे स्वाक्षरीसाठी जाणाºया फाईलींच्या मुद्द्यावरून काही काळ गोंधळ उडाला होता. नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी परिस्थिती हाताळत आपण गुत्तेदारांशी बोलत नाहीत. बिलिंगसाठी येणा-या फाईलींची पाहणी करून, त्रुटींबाबत प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर स्वाक्षरी करत असल्याचे सांगितले.
नगरसेवक जगदीश भाटिया यांनी शहरांतर्गत भागात खासगी कंपनीकडून सुरू असलेले केबल टाकण्याचे काम आणि त्यानंतर न होणारी दुरूस्ती हा मुद्दा उपस्थित केला. हे दुरूस्तीचे काम पालिकेने संबंधितांकडून करून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. आरेफ खान यांनी प्रभागातील चमडा बाजार हटविला नाही तर उपोषण करू, असा इशारा दिला. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी शहरातील उद्यानाचे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, असे नामकरण करण्याची मागणी केली. अमीर पाशा यांनी शहरातील सर्वच पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली.निखिल पगारे यांनी मोती तलावात बसविण्यात येणाºया तथागत गौतम बुध्द यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी संध्या देठे, छाया वाघमारे, जाधव यांच्यासह इतर महिला नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडत त्याचे निराकारण करण्याची मागणी केली. तसेच महिलांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याबद्दल देठे यांनी नगराध्यक्षांना निवेदनही दिले.
सभा : मोकाट जनावरे कोंडणारे गेले कुठे ?
पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक नेमले होते. मात्र, मोजकेच दिवस कारवाई केल्यानंतर हे पथक गायब झाले आहे. रस्त्यावर बसणाºया जनावरांमुळे शहरवासियांना त्रास होत असून, मोकाट जनावरांसह कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरमामुळे उडणारा धुराळा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे खड्डे डांबरीकरणाने भरावेत, अशी मागणी केली. तसेच जिल्हा रूग्णालयाकडे जाणाºया रस्त्याची दुरूस्ती करावी, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक बांगर यांनी कुंडलिका नदीवरील पुलाचे पडलेले कठडे, फॉगिंग मशीन, सात दिवसांत दोन वेळेस न होणारा पाणीपुरवठा आदी मुद्दे उपस्थित करीत पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सतत विषय मांडले, चर्चा झाल्या, आश्वासने मिळाली.
मात्र कामे झाली नसल्याची तक्रार केली. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी तक्रारी सोडविण्यात येतील असे सांगितले. तसेच दोन आधुनिक मशीन व सहा फॉगिंग मशीन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. यावर प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र फॉगिंग मशीन खरेदीची मागणी सदस्यांनी लावून धरली.

Web Title: City councilor aggressive from dengue in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.