आयुक्तांकडून टँकर फेऱ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:51 IST2019-04-14T00:51:06+5:302019-04-14T00:51:46+5:30
टँकरच्या फे-या दिलेल्या नियमानुसार होतात का हे पाहण्यासाठी शनिवारी अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली.

आयुक्तांकडून टँकर फेऱ्यांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ४०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या फे-या दिलेल्या नियमानुसार होतात का हे पाहण्यासाठी शनिवारी अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली. त्यात फे-या नीट होत असल्याचे दिसून आले. परंतु टँकर भरण्यासाठीचे पाण्याचे स्त्रोत मात्र, आटल्याने चर खोदूनच टँकरसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आधीच मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा होता. त्यातच कडाक्याचे उन्हामुळे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने पाणी टंचाईचा मुद्दा गंभीर बनला आहे. जिल्ह्यात एकूण ४०० पेक्षा अधिक टँकर सुरू आहेत. त्यात खाजगी टँकरची संख्या लक्षणीय आहे. या टँकरच्या फे-या नियोजनानुसार होतात काय, हे पाहण्यासाठी टाकसाळे व त्यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे एक पथक गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्हा दौ-यावर आले आहे. त्यांनी प्रारंभी बदनापूर येथील सोमठाण धरणाची पाहणी केली. त्यातही अत्यल्प साठा असून, पाणी पुरणार नसल्याचे चित्र आहे. शनिवारी या पथकाने भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील प्रकल्पांना भेटी दिल्या. तसेच गावकºयांशी टँकरच्या फेºयांबाबत माहिती जाणून घेतल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.
पाहणी : रणरणत्या उन्हात प्रकल्पांना भेट
अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे, नंदकुमार पगारे आणि स्थानिक गटविकास तसेच कृषी विभाग आणि पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांसह त्यांनी शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यातील विविध लघु आणि मध्यम प्रकल्पांना भेट दिल्या. यावेळी मोठी भयावह परिस्थिती असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शुध्दतेची काळजी घ्यावी
लघु आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे चर खोदून विहिरीत पाणी सोडावे लागणार आहे. हे पाणी टँकरव्दारे जनतेला पुरविताना ते शुध्द असले पाहिजे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे पाणी शुध्दीकरणासाठी वापरणारी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश टाकसाळे यांनी यावेळी दिले. एकूणच जिल्ह्यातील टँकरच्या फेºयांबाबतही त्यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधून, त्या ठरवून दिल्यानुसार होतात काय, असे विचारल्यावर अनेकांनी होकार दिला. तसेच खंडित वीजपुरवठा तसेच खराब रस्ते यामुळे टँकर भरून गावात येण्यास अडचणी येतात.