अन्य आजार असलेल्यांसाठी तर हा कोरोनाचा स्टेन जीवघेणा ठरत आहे. एकीकडे कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. त्यात जमावबंदी लावण्यात आली असून, त्याचे पालन होताना दिसत नाही. दुसरीकडे मास्क परिधान केल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही धुडकावले जात आहे. एकूणच दंडाची रक्कम ही २०० रुपये असली तरी ती देण्यासही विनामास्क फिरणाऱ्यांची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. पालिका, पोलीस, तसेच शिक्षकांच्या मदतीने शहरात १२ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जवळपास अडीच हजार जणांकडून साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचेही सांगण्यात येत आहे.
कडक निर्बंध लावण्याची वेळ
कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून, त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. ही वाढ चिंताजनक असून, शहराचा असा एकही भाग नाही, की जेथे पत्रे ठोकलेले नाहीत. त्यामुळे घरातील सर्व परिवारांनाच यात भरडून जावे लागत आहे. घरात सर्व जण आजारी असल्याने रोजचे जगणेही अवघड झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे किंवा न करणे हा सर्वस्वी प्रशासनाचा निर्णय आहे. आधी जे निर्बंध आहेत, त्यांची कडक पद्धतीने अंमलबजावणी व्हावी.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री
--------------
जनतेने काळजी घ्यावी
कोरोनाकाळात लॉकडाऊन हा उपाय महत्त्वाचा आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचे अस्त्र म्हणून लॉकडाऊन होय; परंतु ते लावल्याने हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण होईल हे जरी खरे असले तरी, नागरिकांनी लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे.
भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष
-----------------------------
गर्दी न करण्याचे आवाहन
आज अनेक भागांमध्ये कोरोनाने हात-पाय रोवले आहेत. कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, हे देखील समजत नाही. त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप वाढल्यास तातडीने चाचणी करणे गरजेचेे आहे. अनेक जण भीतीपोटी चाचणीही करीत नाहीत. ही बाब गंभीर आहे. मास्क वापरण्यासह किरकोळ कामांसाठी गर्दी टाळल्यास संक्रमणाचा वेग कमी होऊ शकतो.
आ. कैलास गोरंट्याल, जालना
----------------------------
पोलिसी खाक्या दाखवाच
आज कोरोनाने शहर व परिसरात कहर केला आहे. एकट्या जालन्यात २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनीच नागरिकांना खाक्या दाखविण्याची वेळ आली आहे. जमावबंदी असो, की विनामास्क फिरणे असो, यावर वचक राहिल्यासच जनता सतर्क होईल.
राजेंद्र राख, कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस, जालना