श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:27+5:302021-01-04T04:26:27+5:30
जालना : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे, यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान निधी ...

श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी अभियान
जालना : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे, यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान निधी संकलन व संपर्क अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रथम दीपक तांबोळी यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीतील कार्यकारिणी सांगितली. निधी संकलनासाठी रामसेवक, कार्यकर्ते निधी समर्पणजमा करणार आहेत. यात जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा, यासाठी १० रुपये, १०० व हजार रुपयांची कूपन्स काढण्यात आली आहेत. या कूपन्सवर काढण्यात आलेली श्रीराम मंदिराचे आकर्षक चित्रही कूपनद्वारे घरोघरी जाणार आहे. या अभियानासाठी देशभरात राम सेवाकाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याची समिती गठित करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात ९५८ गावे अशी संपर्काची रचना लावण्यात आली आहे. किमान १८ हजार रामसेवक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुमारे ३ लाख ७५ हजार कुटुंबांपर्यंत संपर्क करणार आहेत. अभियानाच्या पूर्वतयारीसाठी धर्माचार्य संमेलन घेण्यात येणार आहे, तसेच तालुकाश: सामाजिक सदभाव बैठक आणि महिला मेळावेदेखील होणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत विविध भागांत ही संमेलने, मेळावे होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून हे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले. यावेळी कैलास तोष्णीवाल, सीमा मोहिते, श्रीमंत मिसाळ, रवी राऊत, प्रशांत नवगिरे आदींची उपस्थिती होती.
तरुणांना श्रीराम जन्मभूमी मंदिराचा इतिहास
या अभियानात रामभक्तांनी केवळ निधीच नाही, तर त्यांचा वेळही द्यावा, असेही आमचे आवाहन असल्याचे घनश्याम गोयल यांनी सांगितले. शिवाय देशातील नव्या पिढीला श्रीराम जन्मभूमी मंदिराचा इतिहास ज्ञात व्हावा, यासाठी या अभियानात घरोघरी जाऊन हा इतिहास सांगितला जाणार आहे. यात देशाच्या सर्व भागात रामभक्त संपर्क करणार असल्याचेही सांगण्यात आले.