संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:39+5:302020-12-27T04:22:39+5:30
जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन ...

संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार
जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, असे प्रतिपादन प्राचार्या अपर्णा पवार यांनी केले. गुरुवारी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.
शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अपर्णा पवार या होत्या. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, जिल्हाप्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, पांडुरंग वाजे, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्राचार्या पवार म्हणाल्या, आज सर्व घटकांतील वातावरण बदलले आहे. युवतींनी आपली आयुष्याची दिशा ठरविताना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संगत धरली पाहिजे. मुलींनी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीचे आकलन करून पुढे जावे, असा सल्लाही पवार यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात साने गुरुजी कथामालेच्या सहकार्याने देण्यात आलेल्या पुस्तकांचा संच विद्यालयास देण्यात आला. सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व किरण शर्मा यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका शुक्ला, सतीश संचेती, देशपांडे, सानप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
फोटो
जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या अपर्णा पवार, आर. आर. जोशी, डॉ. सुहास सदावर्ते, प्रा. दिगंबर दाते आदी.