Bogus practice by Munnabhai! | मुन्नाभार्इंकडून जिवाशी खेळ !

मुन्नाभार्इंकडून जिवाशी खेळ !

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : समाजात डॉक्टरी पेशाला दैवत मानले जाते. परंतु पैशाच्या लोभापोटी काही लोक चुकीच्या पद्धतीने तसेच नियमांना डावलून लोकांच्या जिवाशी खेळत असल्याचे वास्तव आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील रूग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये अनेक मुन्नाभाईं नियमांना डावलून प्रॅक्टिस करत असल्याचे उघडकीस आले, असे असतांनाही जिल्ह्यात ७६ बोगस डॉक्टरांपैकी केवळ १० डॉक्टरांवरच कारवाई करण्यात आली आहे. उवर्रित ६६ मुन्नाभाई रूग्णांच्या जीवाशी अद्यापही खेळत आहेत.
वैध पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणे, पदवी एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसऱ्या पॅथीची, तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अ‍ॅक्टनुसार नोंदणी न करता प्रॅक्टिस करणा-या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. कंपाउंडर म्हणून काम केल्याच्या अनुभवाचा गैरफायदा घेत जिल्हयात अनेक बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बोगसगिरी टाळण्यासाठी असलेली सरकारी समिती अकार्यक्षम असल्याने हे डॉक्टर वाढतच आहेत. ग्रामीण भागात ही संख्या जास्त आहे. कमी पैशात उपचार होतात म्हणून या डॉक्टरांकडे गर्दी होते
या गावांमध्ये मुन्नाभार्इंचा वावर..
परतूर तालुक्यातील येणोरा, पाटोदा, माव, धामणगाव, संकनपुरी, लांडक, दरा, चांगतपुरी, वलखेड, अकोली. मंठा तालुक्यातील नायगाव. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी बसस्टॅड. जाफराबाद तालुक्यातील माहोरा, देळेगव्हाण, केदारखेडा, शिपोरा बाजार, गोलापांगरी.
बदनापूर तालुक्यातील बदनापूर, निकळक, वाल्हा, गेवराई बाजार, ढासला, सोमठाणा, सायगाव, नागेगाव, कुसळी, बाजार वाहेगाव, बुटेगाव, काजळा, केळीगव्हाण, हिवर, उज्जेनपुरी, आन्वी, डावरगाव, कंडारी बु, बावणे पांगरी, भाकरवाडी, कंडारी, तुपेवाडी.
अंबड तालुक्यातील शेवगा (पा), चिंचखेड, पिंपरखेड, लोणार भायगाव, माहेर भायगाव, देवगव्हाण, भ. जळगाव, टाका, सोनक पिंपळगाव, कोळी सिरसगाव, दहिपुरी, रोहिलागड, कर्जत, धाकलगाव, वाळकेश्वर, साष्ट पिंपळगाव, किनगाव चौफुली, आलमगाव, नागझरी, शहागड, म. चिंचोली, राजा टाकळी आदी ठिकाणी बोगस डॉक्टर असल्याचा अहवाल आहे.
दहा डॉक्टरांवर कारवाई
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १० डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात एस. भांदुर्गे (घनसावंगी) डॉ. ज्ञानेश्वर मोरे (गोलापांगरी), डॉ. उत्तम रोहिदास मुजूमदार (गोलापांगरी), डॉ. विश्वास सरकार (गेवराई बाजार), डॉ. लतिफ पठाण (डावरगाव), डॉ. संशात बाऊल (कंडारी बु.), डॉ. रमेश रूस्तुमराव जायभाये (कंडारी), डॉ. गणेश त्र्यंबक आवचार (नानेगाव), अमोल जगदीश जागृत (म. चिंचोली), युवराज गुलाब डेगंळे (रा. टाकळी) यांच्यावर कारवाई केल्याची माहिती डीएचओ विवेक खतगावकर यांनी दिली.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची परवानगी आवश्यकच
परराज्यात वैद्यकीय पदवी घेतली असली तरी महाराष्ट्रात प्रॅक्टिस करायची असेल तर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करणे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी कौन्सिल व इंडियन मेडिकल असोसिएशनची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, वाड्या- पाड्यांवर प्रॅक्टिस करणारे बंगाली डॉक्टरांकडे अशी कोणतीही परवानगी नाही.
बोगस बंगाली डॉक्टर
शासकीय आरोग्याची सेवा तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जाता आहे. ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचे उपचार गरिबांच्या जीवावरच बेतण्यासारखे आहेत. तर दुसरीकडे ढिम्म जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कठोर कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: Bogus practice by Munnabhai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.