जालन्यात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; अत्याचार करून खून केल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 14:13 IST2021-02-10T14:11:36+5:302021-02-10T14:13:27+5:30
crime news चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका इसमाला डी. मार्टसमोरील आडरानात महिलेचा मृतदेह दिसला.

जालन्यात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; अत्याचार करून खून केल्याचा संशय
जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका इसमाला डी. मार्टसमोरील आडरानात महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या अंगावर आणि डोक्यावर वार केल्याचे दिसून आले. महिला विवस्त्र होती. महिलेजवळ सोन्याची पोत, विडी आढळून आली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने घेतले आहेत. दरम्यान, सरकारी पंच न आल्यामुळे पोलिसांना पंचनामा करता आला नाही. जवळपास दोन ते अडीच तास मृतदेह जागेवरच होता. पंच आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मयत महिलेची ओळख पटली नसून, पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक बागूल यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या.
अत्याचार करून खून केल्याचा संशय; मृतदेहाजवळ सापडले तिकीट
सदरील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. डोक्यावर व तोंडावर जखमा दिसून आल्या आहेत. महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने महिलेवर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, महिलेच्या मृतदेहाजवळ बसचे तिकीट सापडले आहे; परंतु तिकिटावरील नावे दिसत नाहीत.