रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST2021-05-24T04:28:45+5:302021-05-24T04:28:45+5:30
जालना : कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता एक हजारपेक्षा अधिकवर पोहोचली आहे. सध्या कोरोनाने मृत्यू झाल्यास जालन्यात केवळ ...

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?
जालना : कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता एक हजारपेक्षा अधिकवर पोहोचली आहे. सध्या कोरोनाने मृत्यू झाल्यास जालन्यात केवळ एकाच म्हणजेच गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. हिंदू संस्कृतीप्रमाणे रक्षा आणि अस्थींचे विसर्जन महत्त्वाचे मानले जाते. परंतु, बोटावर मोजण्याएवढेच लोक हे नेण्यासाठी येत असून, नाहीतर दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून आम्हीच सर्व रक्षा आणि अस्थींचे विसर्जन करीत असल्याचे सांगण्यात आले.
जालना पालिकेच्यावतीने कोरोनाने मृत्यू झालेल्यावंर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. गांधीनगर येथे यासाठीची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची भीती आजही प्रचंड आहे. अनेक जवळचे नातेवाईकही मृतदेहांना अग्निडाग आणि मृतदेहास पाणी पाजण्याची परंपरा करतानाही भीत असल्याचे दिसून आले. आम्ही नातेवाइकांना पीपीई कीट घालून तुम्ही परंपरा पाळा असे सांगतो. परंतु, खूप कमी लोक यासाठी पुढाकार घेतात. नाहीतर सर्व तुम्हीच करा असे सांगून अंत्यसंस्कार होईपर्यंत दूर थांबून श्रद्धांजली अर्पण करून निघून जातात. त्या मृतदेहाची राख आणि अस्थी आम्ही कुंडलिका नदीत विसर्जित करतो. जेणेकरून दुसऱ्या मृतदेहावर सुरळीत अंत्यसंस्कार करणे सोपे होते.
अस्थींचे पूजन आणि विसर्जन गरजेचे
अस्थींचे पूजन आणि विसर्जन करणे गरजेचे हिंदू संस्कृतीत मृताच्या अस्थी आणि रक्षाविसर्जनाचे काम मोठे मानले जाते. या अस्थी आणि रक्षाही गंगेत सोडली जाते.
कडक निर्बंधांमुळे प्रवास शक्य नसल्याने अडचणी आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच हे विसर्जन केले जाते. त्यामुळे हा प्रश्न आता गंभीर बनल्याचे दिसून येते.
अस्थी आणि रक्षाविसर्जनामागे जेथे अंत्यसंस्कार झाले आहेत, तो परिसर स्वच्छ करण्यासह नवीन येणाऱ्या मृतदेहासाठी जागा स्वच्छ असावी हादेखील एक उद्देश आहे.
गांधीनगर स्मशानभूमी
शहरातील गांधीनगर भागात कोरोनाने मृत्यू झालेल्यासांठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण येथेच दाह केले जातात. त्यामुळे ज्यांनी अस्थी आणि रक्षा मागितली त्यांना आम्ही ती देतो, तर काहीजण दुसऱ्या दिवशी येतो म्हणून सांगतात आणि येत नाहीत, असेही विदारक अनुभव आम्हाला आले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी नमूद केले. ही बाब दुर्दैवी म्हणावी लागते.
रामतीर्थ स्मशानभूमी
जालना शहरात नवीन आणि जुना असे दोन विभाग आहेत. त्यात जुना जालना भागातील बहुतांश मृतांवर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, कोरोना काळात येथूनही फार कमी लोक रक्षा तसेच अस्थी घेऊन जात आहेत. येथे पालिकेकडून सर्व ती सुविधा दिली आहे. आता लवकरच येथे विद्युतदाहिनी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अमरधाम स्मशानभूमी
नवीन जालना भागातील बहुतांश नागरिक हे मृतांवरील अंत्यसंस्कार हे अमरधाम म्हणजेच शेरीमध्ये करतात. येथे मारवाडी समाज आणि अन्य समाजांसाठी अशा एका भागात दोन स्मशानभूमी आहेत. येथेही पालिका, तसेच स्वयंसेवी संस्था जय शंभो बफनीकडूनही मदत केली जाते. रक्षा आणि अस्थी नातेवाइकांनी न नेल्यास ती नदीत विसर्जित केली जात असल्याचे सांगण्यात आले.
काय म्हणतात कर्मचारी...
जालना पालिकेकडून गेल्या वर्षभरात जवळपास एक हजार २०० पेक्षा अधिक कोरोनाने मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातील बहुतांश जण हे रक्षा आणि अस्थी नेण्यासाठी येतात. जर कोणीच आले नाही तर आम्हीच शेजारील नदीत ते विसर्जित करतो.
अरुण वानखेडे, कर्मचारी.
रामतीर्थ स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. परंतु, असे असतांनाही अनेकजण अंत्यसंस्कार झाल्यावर रक्षा आणि अस्थी नेण्यासाठी येतात. परंतु, न आल्यास तीन दिवसांनंतर आम्हीच ती जागा स्वच्छ करतो.
- रवी साळवे
कोरोनामुळे जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यावर पुरुष मंडळी बरीच भेदरलेली असतात. त्या तुलनेत महिलांची हिंमत मोठी दिसून आली. पती अथवा पित्यास मुली पीपीई कीट घालून पाणी पाजण्यासह अग्निडाग देत असल्याचे आम्ही जवळून पाहिले आहे. -श्रावण सराटे